कोल्हापूर : ‘इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स इन दि कोर्टरूम’ हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. पुस्तक लिहिण्यासाठी अनेक अभ्यासपूर्ण स्रोत वापरले आहेत. उलट तपासणीचे स्वतंत्र प्रकरण केले आहे. हे पुस्तक वकिलांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केले.
अॅड. युवराज नरवणकर यांनी लिहिलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स इन दि कोर्टरूम’ या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन न्यायमूर्ती कर्णिक, दैनिक ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, भारताचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल रफीक दादा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते शनिवारी झाले. अॅड. युवराज नरवणकर प्रमुख उपस्थित होते. सयाजी हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात न्यायमूर्ती कर्णिक बोलत होते. भारताचे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल रफीक दादा म्हणाले, आयएएस आणि आयपीएस प्रशिक्षणार्थींच्या संदर्भासाठी ‘इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स इन दि कोर्टरूम’ या पुस्तकाचा वापर करण्यात येत आहे. तसेच, मद्रास उच्च न्यायालयात एका खटल्यातही या पुस्तकाचा संदर्भ देण्यात आला होता. अॅड. नरवणकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकामुळे कायदेविषयक बाबीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर आले आहे.
अॅड. नरवणकर म्हणाले, भारतीय साक्ष अधिनियमात कागदपत्रे व मौखिक पुरावे यांना स्थान होते; पण अलीकडच्या काळात तांत्रिक पुरावे, जसे की व्हॉटस्अॅप, फेसबुक, ई-मेल आदी तांत्रिक पुराव्यांचा वापर वाढू लागला आहे. त्याला अनुषंगिक भारतीय पुरावा अधिनियमात सन 2000 सालात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. क्लिष्ट तांत्रिक संकल्पना आकृती आणि आराखड्यांद्वारे वकिलांना सोप्या भाषेत समजतील अशा पद्धतीने मांडण्यात आले आहेत. तज्ज्ञांची उलट तपासणी कशी घ्यावी? त्याचा मसुदा, प्रश्नोत्तरांची माहितीही पुस्तकात देण्यात आली आहे.
सन 2023 सालात भारतीय पुरावा अधिनियमऐवजी भारतीय साक्ष कायदा 2023 हा नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. नवीन कायद्यातील बदल काय आणि कसे आहेत? तांत्रिक पुरावे न्यायालयात कसे सिद्ध करावेत, तसेच कोणती खबरदारी घ्यावी? यासंदर्भात पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आले आहे.