कोल्हापूर : खाद्यपदार्थांमधील घातक भेसळीमुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याचं अक्षरश: खोबरं होऊ लागलं आहे. केवळ भेसळीमुळे अनेक दुर्धर आजारांना बळी पडणार्या लोकांचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भेसळसम्राटांना आजन्म अद्दल घडविण्याची गरज आहे. राज्यातील अन्न-औषध प्रशासनानेही आता या बाबतीत जागृत होऊन कठोर कारवाईसाठी पुढे सरसावण्याची गरज आहे.
भेसळ आणि आजार!
पिठी साखर आणि हळदीत मिसळण्यात येणार्या खडू पावडरमुळे पोटाचे आणि मूत्राशयाचे गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. पिठीसाखरेत, दुधात आणि बनावट आईस्क्रीममध्ये मिसळण्यात येणार्या धुण्याची पावडर आणि सोड्यामुळे जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आतड्याचे गंभीर आजार उद्भवत असल्याचे निदर्शनास आले आहे. खाद्यतेलात मिसळण्यात येणार्या अन्य तेलांमुळे शरीरात अतिरिक्त चरबी वाढून रक्तदाब, मधुमेह आणि स्थूलता येऊ शकते. लाल मिरची पावडरमध्ये मिसळण्यात येणार्या विटांच्या भुकटीमुळे किडन्यांना घातक इजा होऊ शकते. डाळी रंगविण्यासाठी वापरण्यात येणार्या रंगांमुळे अनेक प्रकारचे त्वचारोग उद्भवू शकतात. आइस्क्रीममधील डालड्याच्या वापरामुळे हृदयरोगाची भीती कित्येक पटीने वाढते. त्याचप्रमाणे सॅकरीनमुळे मधुमेहाला निमंत्रण ठरलेलेच आहे. कॅल्शियम कार्बाईडच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करण्यासाठी जे जे म्हणून घटक वापरण्यात येतात, ते सगळेच्या सगळे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
20 टक्के आजार भेसळीमुळे!
आज राज्यात उद्भवत असलेल्या एकूण आजारांपैकी जवळपास पंधरा ते वीस टक्के आजार हे अन्नपदार्थांमधील आणि खाद्यपेयांमधील भेसळीमुळे होत असल्याचे आढळून आलेले आहे. देशात दरवर्षी जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू हा केवळ या भेसळीमुळे होताना दिसतो. श्वसनाचे विकार, मधुमेह, कॅन्सर, वेगवेगळे त्वचारोग, स्थूलता, पोटाचे विकार, मेंदूविकार, आतड्याचे विकार आदी बहुतांश विकार हे केवळ खाद्यान्नांमधील भेसळीमुळे होत असल्याचे चव्हाट्यावर आले आहे. त्यामुळे याबाबतीत आता सर्वांनीच सर्व पातळीवर खबरदारी घेण्याची वेळ आलेली आहे.
खाद्यान्नातील भेसळीला आळा घालण्यासाठी शासनाने अन्न-औषध विभाग तयार केला आहे, पण या विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांचेच या भेसळीला अभय मिळताना दिसत आहे. दरमहा करोडो रुपयांच्या वरकमाईच्या हव्यासापायी हा विभाग राज्यातील जनतेला भेसळीच्या विळख्यात ढकलत आहे.
देशात आढळून येणार्या किडनीच्या रुग्णांपैकी 70 ते 80 टक्के लोक हे चायनीज पदार्थांचे भोक्तेअसल्याचे आढळून आलेले आहे. चायनीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने सोयाबीन कृत्रिमरित्या कुजवून केलेले सोयासॉस, कॉर्नफ्लॉवर, अॅजिनोमोटो, अनेक प्रकारचे रंगीत सॉस, काही रासायनिक पावडरी, मोनो सोडियम ग्लुकामेट इत्यादी पदार्थ वापरण्यात येतात. या पदार्थांच्या वापरामुळे नेहमी संवेदनशील असणारी जीभ भ्रमिष्ठ होते आणि पदार्थांच्या चवीबद्दल मेंदूला चुकीचे संदेश पाठविते. (या प्रक्रियेला न्युरोेन्स नेटवर्क बाधित करणे म्हणतात.) त्यामुळे मनुष्याला आपण जे काही खात आहोत, ते चविष्ठ असल्याचा भास होतो. प्रत्यक्षात ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. याला म्हणतात जिभेचा भ्रमिष्ठपणा. असल्या प्रकारांमुळेे चायनीज पदार्थांना जगभरात ‘चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम्स’ म्हणजे चायनीज रेस्टॉरंटमधून आलेले आजार म्हणतात. चायनीज पदार्थांच्या खाण्यामुळे मस्तिष्काघात, ब्रेन हॅमरेज, लकवा मारणे आदी विकार बळावण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. त्यामुळे अनेक पाश्चात्य देशांमध्ये चायनीज पदार्थांवर बंदी आहे. जगभरातील अनेक विमान कंपन्यासुद्धा आपल्या विमानातील प्रवाशांना प्रवासादरम्यान हे असले चायनीज पदार्थ वाहून नेण्यास बंदी करतात. चायनीज पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे अॅजिनोमोटो म्हणजे तर सरळ सरळ कॅन्सरला निमंत्रण देण्याचा प्रकार आहे.