कोल्हापूर : मौजे सांगाव (ता. कागल) येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमता प्रत्येकी 100 असून पूर्ण प्रवेश क्षमतेने हे अभ्यासक्रम सुरू राहणार आहेत.
दरम्यान, उत्तूर (ता. आजरा) येथील शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील तिसऱ्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या तिन्ही शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, उत्तूर (ता. आजरा) येथे देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय मंजूर झाले आहे. या महाविद्यालयाचे वर्ग बहिरेवाडी येथील जे. पी. नाईक स्मारकाच्या इमारतीत सुरू आहेत. महाविद्यालय व रुग्णालयाचे काम उत्तूर-धामणे रस्त्यावरील 17 एकरांच्या विस्तीर्ण जागेत प्रगतिपथावर आहे. शासकीय निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत यांनी या दोन्ही महाविद्यालयांचा आढावा घेतला. तसेच पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजित अहिरे यांनी महाविद्यालयाचा आढावा घेतला.