कोल्हापूर

कोल्हापूर : मेघोली पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा

Arun Patil

कोल्हापूर, सुनील सकटे : मेघोली तलावाचे धरण फुटून दीड वर्षांनंतर धरणाच्या पुनर्बांधणीस मुहूर्त मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे. मेघोली पुनर्बांधणीच्या 41 कोटी 64 लाख 49 हजार 673 रुपयांच्या प्रस्तावास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता तांत्रिक मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. प्रशासकीय मान्यता झाल्याने आता निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील अनेक धरणांना गळतीचा धोका असून मेघोली धरण एक सप्टेंबर 2021 रोजी फुटले. धरण फुटल्याने शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एका महिलेस जीव गमवावा लागला. धरण फुटल्यानंतर त्याच्या कारणीमीमांसाची चर्चा सुरू झाली. धरण फुटून दोन वर्षे तीन महिने 11 दिवस होऊन गेले आहेत. जलसंपदा विभागाच्या कोल्हापूर दक्षिण या कार्यालयाकडून हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केला आहे. धरण पुनर्बांधणीसाठी धरणस्थळी बोअर घेण्यात आले आहेत. तसेच खडकांचे नमुनेही घेण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळेे संथगतीने कार्यवाही सरकत आहे. 27 जानेवारी 2022 रोजी धरण तांत्रिक समितीने धरणस्थळी भेट दिली आहे. या समितीने धरण पुनर्बांधणीसंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.

जलसंपदा विभागाकडे असताना या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपयांचे प्राथमिक अंदाजपत्रक तयार केले होते. जलसंधारण विभागाकडे प्रकल्प गेल्यानंतर 9 डिसेंबर 2022 रोजी प्रशासकीय मान्यतेसाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. मात्र, मापदंडात असफल असल्याचे मत समितीने नोंदविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास बाब म्हणून या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. 41 कोटी 64 लाख 49 हजार 673 रुपये खर्चास मान्यता दिली.

510 हेक्टर क्षेत्रास प्रकल्प फायदेशीर

मेघोली धरण भुदरगड तालुक्यातील मौजे मेघोली गावचे स्थानिक ओढ्यावर सन 2000 साली बांधण्यात आलेे. हा ओढा पुढे जाऊन वेदगंगा नदीस मिळतो. हा लघु पाटबंधारे प्रकल्प डोंगराळ भागात आहे. या भागातील शेतीसाठी जास्तीत जास्त सिंचनाचा फायदा करून देणेसाठी उपयोग केला जातो. या प्रकल्पात एकूण पाणीसाठा 98.43 दशलक्ष घनमीटर इतका होतो. प्रकल्पांतर्गत 11 कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांद्वारे वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे सुमारे 510 हेक्टर क्षेत्रास फायदा होऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT