मुदाळतिट्टा : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांचे मंदिर ३ मार्च ते ६ मार्च २०२६ या कालावधीत दर्शनासाठी बंद राहणार आहे. ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी देवस्थान समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
७ मार्चपासून सुरू होणाऱ्या भव्य भंडारा उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी मांदियाळी असते. या सोहळ्यापूर्वी संपूर्ण मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी हे चार दिवस नियोजित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर परिसर आणि गाभारा, अन्नछत्र (जिथे लाखो भाविक महाप्रसाद घेतात), भक्तनिवास आणि देणगी विभाग या सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे या काळात पूर्ण केली जाणार आहेत.
स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यानंतर ७ मार्च २०२६ पासून वार्षिक भंडारा उत्सवाला दिमाखात सुरुवात होईल. या दिवशी मंदिर पुन्हा भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. भंडारा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि उत्सव शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. तरी ३ ते ६ मार्च दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये आणि देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले आणि कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी केले आहे.