नेसरी : कानडेवाडी हद्दीत गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात सुवर्णा राहुल कुंदेकर (वय 29, रा. अडकूर, ता. चंदगड) यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी नेसरीचे सहायक पोलिस निरीक्षक आबा गाढवे यांनी संशयितास मदत केल्याचा आरोप करत हजारभर अडकूर ग्रामस्थांनी नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
सुवर्णा यांच्या मृतदेहावर पोलिस ठाण्यासमोरच अंत्यसंस्काराची भूमिका घेत सरण रचण्यास प्रारंभ केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. अखेर गाढवे यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी अडकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राहुल कुंदेकर पत्नी सुवर्णा यांना प्रसूतीनंतर गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयातून अडकूरला कारमधून (एमएच 04 डीएम 3749) मधून घेऊन जाताना चंदगडकडून येणार्या कार (एमएच 09 जीए 7515)चे चालक व चंदगड नगरपंचायतीकडील कर निर्धारण अधिकारी स्वप्निल रानगे ठोकर दिल्याने दोन्ही मोटारींचा चक्काचूर झाला. या अपघातात राहुल कुंदेकर (वय 32) मुलगा रुद्र कुंदेकर (3), सात दिवसांचे बाळ व सुवर्णाची आई आरती संजय भांबर (60) जखमी तर सुवर्णा गंभीर होत्या. शुक्रवारी सकाळी सुवर्णा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूची माहिती अडकूरमध्ये कळताच ग्रामस्थांनी नेसरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संशयितास वाचवण्यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा आरोप केला. यामुळे संतप्त नागरिक पोलिस ठाण्यासमोर सुवर्णा यांचा मृतदेह घेऊन आले. संशयितास हजर करा, स.पो.नि. आबा गाढवे यांना निलंबित करा, अन्यथा पोलिस ठाण्यासमोरच अंत्यसंस्कार करू, अशी आक्रमक भूमिका घेतली.
गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले, चंदगडचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह भुदरगड येथूनही कुमक मागविण्यात आली. जमाव आक्रमक झाला होता. दरम्यान, आ. शिवाजी पाटील यांनी स.पो.नि. आबा गाढवे यांच्यावर कारवाईची हमी दिल्यानंतर आणि संशयित रानगे याला गडहिंग्लज येथे हजर करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी दुपारी सुवर्णा कुंदेकर यांच्यावर अडकूर येथे अंत्यसंस्कार केले.