कोल्हापूर : पक्ष संघटनेसाठी राबणार्या निष्ठावंतांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याची भूमिका पक्ष नेतृत्वाची आहे, असे महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महिलांच्या चेहर्यावरील आनंद हिरावून घेण्याचे काम महायुतीचे सरकार कधीही करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने गुरुवारी पदाधिकारी कार्यकर्ता परिसंवाद मेळावा शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. सभासद नोंदणीचा राज्याचा आढावा घेत असताना कोल्हापूर जिल्ह्याचे नाव कायम पहिल्या पाच जिल्ह्यांत राहिले आहे, असे सांगून तटकरे म्हणाल्या, संघटनेत काम करताना कार्यकर्त्यांना खूप अडचणी येत असतात. त्यातून हे कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणार्यांनाच संधी मिळेल.
महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांनी स्वागत करताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी प्रास्ताविकात सभासद नोंदणीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद असल्याचे सांगितले. शहराध्यक्ष आदिल फरास, माजी आमदार राजेश पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल साळोखे, महिला शहराध्यक्ष रेखा आवळे, अमरसिंह पाटील, बाबासाहेब देशमुख, महेंद्र चव्हाण, यशवंत थोरवत, संभाजी पवार, मधुकर जांभळे, जहिदा मुजावर आदी उपस्थित होते.
समाजकारण, राजकारणाची पद्धत आता बदलली आहे. सत्ता असताना संघटनेला बळ येते; परंतु सत्ता नसली की संघटनेत काम करताना आव्हान असते. कोल्हापूर जिल्ह्यातील संघटन मजबूत आहे. ते वाढविण्यासाठी आणि अधिक मजबूत करण्याकरिता कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही तटकरे यांनी केले.