कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, अमोल येडगे, के. मंजूलक्ष्मी, कार्तिकेयन एस., महेद्र पंडित, ओमप्रकाश दिवटे आदी. Pudhari File Photo
कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी अतिरिक्त निधी : उपमुख्यमंत्री पवार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी गरज पडल्यास अतिरिक्त निधी दिला जाईल. त्याकरिता जिल्हा नियोजन समितीत जादा निधीची तरतूद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. नाट्यगृह जसेच्या तसेच उभे केले जाईल, त्याकरिताचा निधीही वेळेतच दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आगीच्या घटनेची पोलिसांकडूनही चौकशी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी रविवारी सकाळी नाट्यगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कलावंतांशीही संवाद साधला. दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, नाट्यगृहाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, ते जसेच्या तसे उभे राहू शकते. तसे कारागीर, आर्किटेक्चर, कंत्राटदार आहेत. कोल्हापूरकरांच्या जसे मनात आहे तसेच हे नाट्यगृह उभारले जाईल. याप्रकरणी नेमलेल्या समितीकडून आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल, तसेच याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे, त्यामुळे पोलिस चौकशीही होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमकार दिवटे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

बारकावे लक्षात घेऊन नाट्यगृहाचे काम करा

पाहणीनंतर नाट्यगृह पूर्वीसारखे पुन्हा तयार झाले पाहिजे, अशा सूचना पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या. ते म्हणाले, बारकावे लक्षात घेऊन तसे काम करा. शक्य असेल तर नाट्यगृहाची उंची वाढवा. एसीचे बाहेरील युनिट सुरक्षित ठिकाणी बसवा. छताचा पत्रा उत्कृष्ट दर्जाचा वापरा. संरक्षक भिंतीही जुने पुरावे किंवा छायाचित्र पाहून चांगल्या पद्धतीने करा. स्वच्छतागृह, इतर भिंती आणि दगडांचे बांधकाम मजबूत, एकसारखे, ऐतिहासिक दिसेल असे करा, अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT