मुदाळतिट्टा : श्रीक्षेत्र आदमापुर येथील सद्गुरु बाळूमामा यांची वार्षिक भंडारा यात्रा लाखों भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.28 रोजी संपन्न झाली. यात्रेनिमित्त श्री च्या पालखीचा सहवाद्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला. या मिरवणुकीत आठ टन भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. पिवळ्या भस्माच्या उधळणीमुळे आदमापुर चे रस्ते पिवळे धमक झाले होते.
पारंपारिक वाद्याचा गजर , धनगरी ढोल वादन, हरी भजनाची साथ या पालखी सोहळ्याला लाभली. बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत बाळूमामाचे भक्तगण आपल्या नवसाचा भंडारा उधळण करत होते. कोणताही अनुचित प्रकार न होता यात्रा सुरळीत पार पडली. पालखी सोहळ्यामध्ये बाळूमामाच्या बग्यातील अश्व सहभागी झाले होते. हलगी कैताळाच्या आवाजात अश्वांनी केलेला नाच लक्षवेधी ठरला. यात्रा काळात श्री च्या मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई आकर्षण ठरली. मंदिरात केलेली विविध रंगांच्या फुलांची सजावट व मंदिर परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या वैशिष्ट्यपूर्ण होत्या.
यात्रा काळात लाखो भाविकांनी बाळूमामांचे दर्शन घेतले. यावर्षी यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन देवालय प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व बाळूमामाचा भक्तगण यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन यात्रेसाठी केले होते. यात्रेसाठी आवश्यक असणारा पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्यासाठी आवश्यक असणारा दवाखाना, भक्तांच्यासाठी आवश्यक असणारी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्यात आली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा ,आंध्र, राजस्थान व अन्य राज्यातून आलेल्या लाखो भाविकांना कोणत्याही अडचणींना सामना करावा लागला नाही. श्री चे दर्शन सुलभ झाले यामुळे भाविकांत समाधानाचे वातावरण दिसत होते.
यात्रेच्या शेवटच्या दिवशी बाळूमामाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल कैताळाचा गगनभेदी आवाज, फटाक्याची आतषबाजी, हलगी घुमक्याचा ताल, लेझीम, बँड अशी पारंपारिक वाद्यांसह डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई दंगून गेली. हरी भजनात वारकरी बांधव रंगून गेले. बाळूमामाच्या नावानं चांगभलं च्या गजराने सारा गाव दुमदुमून गेला होता. सकाळी आठ वाजता बाळूमामा मंदिर येथून प्रस्थान झालेली पालखी मुख्य रोड मार्गे मरगुबाई मंदिरात भेटीसाठी दाखल झाली. त्यानंतर ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिरामध्ये पालखीची भेट झाली. कर्णसिंह धैर्यशील भोसले यांच्या सरकार वाड्यात पालखी काही काळ स्थिरावली. त्यानंतर मधली गल्ली, माळवाडी, खालची गल्ली मार्गे आड विहीर येते भंडारा अर्पण करुन साडे चार वाजता पालखी मंदिरात स्थिरावली.
त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री ची आरती झाली. पालखी मार्गावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. हजारो भावीक भंडाऱ्यात रंगून गेले. संपूर्ण गावातील रस्ते भंडाऱ्यात पिवळे धमक होऊन गेले होते. प्रांताधिकारी हरेश सुळ, तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलीस निरीक्षक लोंढे, गटविकास अधिकारी शेखर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी वर्धन, यांनी यात्रा काळात विशेष लक्ष ठेवले मानकरी धैर्यशील भोसले, कृष्णात डोणे पुजारी, रागीणी खडके व ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी, तरुण मंडळे यांनी केलेले सहकार्य अतिशय मोलाचे ठरले. सेवाभावी वृत्तीने 400 स्वयंसेवकांनी केलेली सेवक म्हणून जबाबदारी या यात्रेतील वैशिष्ट्य ठरली. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाचे सांगता झाली.