निढोरी- आदमापूर दरम्यान बाळूमामांच्या रथाची मिरवणूक सुमारे पाच तास चालली.  Pudhari Photo
कोल्हापूर

भाविकांच्या मांदियाळीत बाळूमामांच्या रथाची मिरवणूक; भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण

Adamapur Balumama Rath | , डॉल्बीला फाटा, पारंपरिक वाद्यांच्या गजर

पुढारी वृत्तसेवा
प्रा.शाम पाटील

मुदाळतिट्टा: बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी 19 बग्गीतील (कळप) मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामाच्या रथातून विधीपूर्वक आदमापूर कडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. रथाच्या मिरवणुकीसाठी हजारो भाविक उपस्थित होते. बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण, ढोलकैताळाच्या गगनभेदी आवाजात राधानगरी - निपाणी मार्गावरील निढोरी- आदमापूर दरम्यानच्या अवघ्या दीड किलोमीटरच्या अंतरावर रथाची मिरवणूक सुमारे पाच तास चालली. प्रारंभी बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची विधीवत पूजा करण्यात आली.

भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे. राज्य आणि परराज्यातील अनेक भागात राहत असलेल्या बाळू मामांनी जतन केलेली बकऱ्या 19 ठिकाणी बग्गी (दीड ते दोन हजार बक-यांचा कळप) च्या रूपात असतात. प्रथेप्रमाणे भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरीत एकत्र आल्या. या बगीच्या घागरींचे भाविक ग्रामस्थ,व महिलांनी औक्षण करून स्वागत केले.

आदमापुरातून बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीत आगमन झाले. यात्रेसाठी आलेले भाविक वेदगंगेत स्नान करून मारुती देवालयात जमले. येथूनच बाळूमामांनी आपल्या भक्ताकडे सुपूर्द केलेल्या घागरीसह अन्य बग्गीतील दुधाच्या घागरी मानाच्या रथासह आदमापुराकडे रवाना झाल्या. द्वादशी दिवशी सकाळी मानाच्या घागरीतून बाळूमामांच्या समाधीला दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले जाणार आहे.

कर्नाटक, औरनाळ, देवगड, मिरज, मुंबई, गोवा, पंढरपूर मधून आलेल्या दिंडीतील भाविक भक्त या ठिकाणी थांबून रथाबरोबर पुढे मार्गस्थ झाले. उत्साही भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगी- बेरंगी फुलांची पखरण, टाळ-मृदंगाचा गजर, ढोल- ताशाचा दणदणाट, भंडाऱ्यांची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' आदमापूर च्या राजाचे चांगभलंचा जल्लोष करण्यात आला.

निढोरी, आदमापूर येथील बाळूमामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत पुरविण्यात आले. अन्नदान ही करण्यात आले. यावेळी भक्तगण लाखोंच्या संख्येने उपस्थित होता.

दुधाच्या घागरी नेण्याची प्रथा

महाराष्ट्र- कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा उत्सवात आदमापूरपासून दीड कि.मी. वर असलेल्या निढोरीत रथातून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली आहे. धनगर बांधवांनी एक कोटी रुपये खर्च करून मंदिरास प्रदान केलेल्या रथामध्ये 138 किलो वजनाची बाळुमामाची चांदीची मूर्ती विराजमान होती. भंडाऱ्याच्या उधळणीमुळे हा रस्ता पिवळाधमक झाला होता.

कडक वाहतूक व्यवस्था

बाळूमामा रथाच्या मिरवणूक प्रसंगी मुरगुड होऊन येणारी वाहतूक सोनाळी- बिद्री कोल्हापूर - गारगोटी व मुदाळतिट्टा होणारी वाहतूक कूर, वाघापूर, निपाणी, कागल एकेरी करण्यात आली होती. त्यामुळे निढोरी आदमापूर मार्गावर ही मिरवणूक सुरळीत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT