कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सोमवारी डिव्हिजन बेंच आणि दोन सिंगल बेंच न्यायमूर्तींचे स्वागत करून खटल्यांच्या कामकाजाला सुरुवात झाली. कोर्ट रूम क्रमांक एकमध्ये सर्किट बेंचमधील प्रशासकीय अधिकारी, जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्यायमूर्तींना शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, सुनावणींचे वेबसाईटवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. पहिल्या दिवशी मुंबईतील अडीचशेवर वकील आणि सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकारांची मोठी गर्दी झाली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा रविवारी शाही थाटात शुभारंभ झाल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सोमवारी सकाळी साडेदहाला डिव्हिजन बेंच इमारतीमधून सुरुवात झाली. प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11 वाजता तिन्हीही कोर्ट रूममध्ये खटल्यांच्या कामकाजाला सुरुवात झाली.
न्यायमूर्ती कर्णिक, न्यायमूर्ती देशमुख यांच्या डिव्हिजन बेंचकडे 79, न्यायमूर्ती दिगे यांच्या बेंचकडे 74 तर न्यायमूर्ती चपळगावकर यांच्या बेंचकडे 147 खटले बोर्डवर होते. खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबई व पुण्यातील वकिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्किट बेंचमधील कामकाज पाहण्यासाठी कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही दिवसभर गर्दी केली होती.