Marriage Fraud Abuse Case | लग्नाच्या आमिषाने फसवणूक, अत्याचार; आरोपीला सक्तमजुरी 
कोल्हापूर

Marriage Fraud Abuse Case | लग्नाच्या आमिषाने फसवणूक, अत्याचार; आरोपीला सक्तमजुरी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील विकास शंकर चव्हाण (वय 50, रा. मराठा कॉलनी) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 1) आर. व्ही. आदोने यांनी तीन वर्षे कारावास आणि 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 2012 ते डिसेंबर 2018 या काळात हा प्रकार घडला.

पीडित महिलेने दि. 28 डिसेंबर 2018 रोजी चव्हाण याच्या बागल चौक येथील कार्यालयात जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मी तुला ओळखत नाही, असे सांगून दुरुत्तरे केली. त्यामुळे संबंधित महिलेने सोबत आणलेल्या बाटलीतील कीटकनाशक प्राशन केले. बेशुद्धावस्थेत महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला होता.

पीडित महिलेच्या जबाबानुसार, चव्हाणविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अ‍ॅड. मंजुषा बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद, न्यायालयासमोर मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष दाखल पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने चव्हाण याला दोषी ठरविले. भारतीय दंडविधान संहिता 306 नुसार तीन वर्षे सक्तमजुरी, 7 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 4 महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली. दंडातील चार हजार रुपये पीडित महिलेच्या कुटुंबीयांना देण्याचा आदेश झाला आहे.

पीडितीने कीटकनाशक पिऊन जीवन संपविले

पीडित महिला 2012 मध्ये मोबाईल सिम कार्ड खरेदी करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात गेली होते. तेथे त्यांच्यात ओळख झाली. आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून पीडितेवर घरात, गोव्यात नेऊन अत्याचार केला होता. आपले लग्न झाले नसल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याचे लग्न झाले होते. या घटनेमुळे महिलेला धक्का बसला. महिलेने आरोपी काम करीत असलेल्या कार्यालयात जाऊन त्याला जाब विचारला. मात्र, त्याने दुरुत्तरे केल्याने पीडित महिलेने कीटकनाशक प्राशन करून जीवनाचा शेवट करून घेतला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT