कोल्हापूर : रंकाळा ते जुना वाशी नाका मार्गावर पद्माराजे उद्यानसमोर ड्रेनेजचे मोडक्या अवस्थेतील झाकण. संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बॅरिकेडस्‌ लावले आहेत. 
कोल्हापूर

Kolhapur | रंकाळा परिसरातील उघड्या ड्रेनेजमुळे अपघाताचा धोका

पद्माराजे उद्यानासमोर झाकण मोडलेल्या अवस्थेत; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावापासून जुना वाशी नाकामार्गे जाणाऱ्या रस्त्यावर पद्माराजे उद्यानासमोर ड्रेनेजचे झाकण मोडलेल्या अवस्थेत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही परिस्थिती आहे. मोडलेले झाकण रात्रीच्या वेळी सहज नजरेस पडत नसल्याने वाहनचालकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिकांनी या ठिकाणी बॅरिकेडस्‌ लावले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

पर्यटकांसह स्थानिक नागरिक रंकाळा तलावाला भेट देतात. त्यामुळे या परिसरात ट्रॅव्हल्स, टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी बस आणि अन्य चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असताना ड्रेनेजचे झाकण मोडलेल्या अवस्थेत असणे धोकादायक ठरू शकते. दिवसा या ठिकाणी बॅरिकेडस्‌ दिसत असले, तरी रात्रीच्या वेळी अंधारात वाहनचालकांना परिस्थितीचा अंदाज येत नाही. अचानक समोर आलेल्या अडथळ्यामुळे वाहनचालक गोंधळून जाऊ शकतात. दुचाकीस्वारांचा तोल जाणे, वाहनाचे चाक ड्रेनेजमध्ये अडकणे किंवा वाहन वळवताना अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः, बाहेरगावाहून आलेल्या वाहनचालकांना या रस्त्याची आणि ठिकाणाची माहिती नसल्याने धोका अधिक वाढू शकतो.

गेल्याच महिन्यात अपघातात एकाचा बळी

याच रस्त्यावर एक महिन्यापूर्वी शहरातील ट्रक मेस्त्री बाबुराव लोहार यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे रंकाळा परिसरातील रस्ते आणि वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. सण-उत्सवांच्या काळात शहरातील पर्यटनस्थळांकडे नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या वाढत असते. अशा वेळी रस्त्यांवरील उघडी गटारे, मोडलेली झाकणे आणि इतर अडथळे वेळेत दूर करणे गरजेचे आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT