हातकणंगले : हिंगणगाव-कुंभोज रस्त्यावर माळभाग परीसरात झालेल्या अपघातात संस्कार प्रकाश खरात (13, रा. हिंगणगाव, ता. हातकणंगले) हा जागीच ठार झाला, तर जाहिदाबी अल्लाबक्ष मुल्ला (58, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. रविवारी दुपारी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघाताची हातकणंगले पोलिसांत नोद झाली आहे.
याबाबतची माहिती अशी, फारुक अल्लाबक्ष मुल्ला हे दुचाकीवरून आई व मुलीसह हिंगणगाव येथील नातेवाईकांना भेटून कुंभोजकडे निघाले होते. यादरम्यान 13 वर्षीय मुलगा दुचाकीवरून माळ भाग परिसरातील गल्लीतून भरधाव वेगाने आला. यावेळी फारुक यांच्या दुचाकीला त्याच्या दुचाकीची जोराची धडक बसली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या संस्कारच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तो जागिच ठार झाला; तर फारुक मुल्ला, जहिदाबी मुल्ला, खातीजा मुल्ला तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र जहिदाबी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अल्पवयीन चालकाच्या विरोधात हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत .