student academic pressure | गुणांची शर्यत, शैक्षणिक ताणामुळे मुलांमध्ये वाढतोय अ‍ॅकॅडमिक स्ट्रेस  
कोल्हापूर

student academic pressure | गुणांची शर्यत, शैक्षणिक ताणामुळे मुलांमध्ये वाढतोय अ‍ॅकॅडमिक स्ट्रेस

पुढारी वृत्तसेवा

पूनम देशमुख

कोल्हापूर : सध्या बोर्ड परीक्षांचा हंगाम सुरू आहे, लवकरच वार्षिक परीक्षांचा काळही सुरू होईल. यामुळे प्रत्येक घरात अभ्यास, टेस्ट सिरीज, रिव्हीजन आणि निकालाच्या अपेक्षांचे वातावरण आहे. मात्र, गुणांच्या शर्यतीत धावताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर वाढता शैक्षणिक ताण दिसून येत आहे. किशोरवयात अभ्यासाचा जास्त दबाव पुढे चालून नैराश्य, चिंता आणि अगदी सेल्फ-हार्मसारख्या धोकादायक प्रवृत्तींनाही कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेने या वाढत्या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे रिसर्च जर्नल द लॅन्सेट चाइल्ड अँड अ‍ॅडोलेसेंट हेल्थच्या अभ्यासानुसार स्पष्ट होते आहे.

अभ्यास, परीक्षा आणि स्पर्धेमुळे थोडाफार ताण येणे हे विद्यार्थ्यांसाठी सामान्य मानले जाते. हलक्या स्वरूपातील हा ताण विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो, स्मरणशक्ती सुधारतो आणि कामगिरी उंचावतो. मानसशास्त्रात याला यू-स्ट्रेस म्हटले जाते. मात्र, जेव्हा हा ताण आठवडे-महिने टिकतो, झोप, भूक आणि भावनिक संतुलनावर परिणाम करू लागतो, तेव्हा तो गंभीर स्वरूप धारण करतो. सततचा अभ्यासक्रम, गुणांची स्पर्धा, पालक-शिक्षकांच्या अपेक्षा आणि अपयशाची भीती या अनेक घटकांच्या एकत्र परिणामामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रॉनिक अ‍ॅकॅडमिक स्ट्रेस निर्माण होतो. यामुळे चिडचिड, एकाग्रतेचा अभाव, डोकेदुखी, झोपेच्या समस्या आणि आत्मविश्वासात घट दिसून येते.

ताणातून नैराश्याकडे झुकणारी वाट

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास शरीरात कॉर्टिसोल या ताण संप्रेरकाची पातळी वाढलेली राहते. त्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित मेंदूचा भाग हिप्पोकॅम्पस कमकुवत होतो. निर्णयक्षमता आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाचा असलेला प्री-फ्रंटल कॉर्टेक्स मंदावतो, तर भीती आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा अमिग्डाला अधिक सक्रिय होतो. याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये चिंता, थकवा, निराशा आणि नकारात्मक विचार वाढतात. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास नैराश्याचा धोका वाढतो.

सोशल मीडियाची तुलना अन् झोपेची कमतरता

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियामुळेही विद्यार्थ्यांवरील दबाव वाढत आहे. इतरांचे यश, निकाल किंवा परफेक्ट लाइफस्टाइल पाहून सतत तुलना करण्याची भावना निर्माण होते. त्यातच रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर केल्याने झोप कमी होते आणि दुसर्‍या दिवशी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. परिणामी, अपूर्ण कामे, डेडलाईनचा ताण आणि मानसिक दडपण आणखी वाढते.

संतुलित जीवनशैलीच किल्ली - उपाय

वेळेचे नियोजन, किमान 7-8 तास झोप, संतुलित आहार, स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणे आणि नियमित व्यायाम यामुळे ताण नियंत्रित ठेवता येतो. मोठ्या ध्येयांना छोट्या टप्प्यांत विभागणे, भावना व्यक्त करणे आणि तुलना टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गुणांच्या शर्यतीत मुलांचे मानसिक आरोग्य हरवू नये, यासाठी पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेने संवेदनशीलतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT