कोल्हापूर

घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत.

कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी करवीर पोलिसांच्या रेकॉर्डवर आली आहे. संबंधित साखळीच्या शोधासाठी पोलिसांची पथके सांगलीला रवाना झाली आहेत.

चौकशीअंती दोषींना लवकर अटक करण्यात येईल, असे अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, तपासाधिकारी श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या घटकावर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी सकाळी करवीर पोलिसांना दिल्या आहेत.

सोलापूर युनिटमधील दहशतवादविरोधी पथकाच्या सहायक फौजदार शिल्पा यमगेकर यांनी याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. करवीर पोलिसांनी नागदेववाडी (ता. करवीर) येथून सुमन राधेशाम वशिष्ठ उर्फ राधा उर्फ हमिदा बेगम (28, मूळ रा. नारायणगंज, बांगलादेश) हिला अटक केली. घर झडतीत पोलिसांना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि पॅन कार्डही आढळून आले आहे.

संशयित खुशी शहाबुद्दीन भुया शेख (वय 25) हिच्याकडेही आधार कार्ड आढळून आले आहे. असेही तपासाधिकारी शिंदे यांनी सांगितले. करवीर पोलिसांनी हस्तगत केलेली सर्व कागदपत्रे सांगलीतील एजंटाकडून तयार करून घेतल्याची कबुलीही संशयित महिलांनी दिली आहे. संबंधित एजंटांच्या नावाबाबत तपासाधिकार्‍यांनी गोपनियता पाळली आहे.

संशयित महिला डिसेंबर 2023 मध्ये कोल्हापुरात वास्तव्याला आल्या आहेत. असे चौकशीतून निष्पन्न झाले आहे. वशिष्ठ हिच्याविरोधात यापूर्वी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. कोणाच्या मध्यस्थीने दोघी कोल्हापुरात आल्या, याचीही चौकशी सुरू झाली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वायचळ यांच्यासह विशेष पथक पडद्याआड दडलेल्या संशयितांचा शोध घेत आहे.

SCROLL FOR NEXT