Kolhapur News | हातउसने घेतलेले २८ हजार मित्राला परत द्या; राजारामपुरीतील तरुणाने चिठ्ठी लिहून जीवन संपवले 
कोल्हापूर

Kolhapur News | हातउसने घेतलेले २८ हजार मित्राला परत द्या; राजारामपुरीतील तरुणाने चिठ्ठी लिहून जीवन संपवले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मित्राकडून हातउसने घेतलेले २८ हजार रुपये परत करा... आईची बायपास झाली असून एक ऑगस्टला दवाखान्यात न्या, अशी चिठ्ठी लिहून तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. गणेश सदाशिव चौगुले (वय ३४, रा. राजारामपुरी, मातंग वसाहत) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. १३) सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

कसबा बावडा येथील एका बँकेत नोकरीस असलेला गणेश चौगुले आईसोबत राजारामपुरी येथील मातंग वसाहत येथे राहात होता. सोमवारी सकाळी त्याने घरातील जिन्याखाली गळफास घेतल्याने नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यांनी फास सोडवून गणेशला सीपीआर रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, गणेशच्या खिशातून एक चिठ्ठी पोलिसांना आढळून आली. यामध्ये आईची काळजी घ्या. तिची बायपास झाली आहे. एक तारखेला डॉक्टरांकडे घेऊन जा. एका मित्राकडून २८ हजार रुपये हातउसने घेतले आहेत ते परत करा, असा मजकूर लिहिला होता. गेल्या दोन दिवसांपासून गणेश शांत होता. तो कोणासोबतही फारसा संपर्क करत नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. तरुणाच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT