कोल्हापूर : बारावी सायन्सच्या वर्गात शिकणाऱ्या रौनक इंद्रजित आडगुळे (वय १७, रा. सोन्या मारुती चौक) याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. बुधवारी सकाळी सहा वाजता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट आहे.
बुधवारी सकाळी दुसऱ्या मजल्यावरील किचनमध्ये रौनकचे आजाेबा पाणी पिण्यासाठी गेले असता, त्यांना रौनकने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती मुलगा व सुनेस दिली. त्यांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी रौनकचा मोबाईल ताब्यात घेत आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. रौनक रोज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वडिलांकडे देत होता. मंगळवारी रात्रीही त्याने मोबाईल वडिलांकडे दिला होता. आजोबांची प्रकृती ठीक नसल्याने सायंकाळी रौनकने त्यांना औषध, ‘ओआरएस’ दिले. रात्री त्यांच्याच खोलीत थांबवण्याविषयी तो आजोबांना बोलला होता आणि बुधवारी त्याचा मृतदेह बघण्याची कुटुंबीयांवर दुर्दैवी वेळ आली.