कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. सोमवारी त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात गोकुळ निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. लवकरच त्यांचा अधिकृत पक्षप्रवेशही होणार आहे. यामुळेे गोकुळमधील राधानगरी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादीची माजी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात सामील होत गोकुळ निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांना बिनशर्त पाठिंबा दिला.
राधानगरीतून राष्ट्रवादीकडून सध्या गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी संचालक किसन चौगले यांची नावे निश्चित मानली जात आहेत. पण ए. वाय. यांच्या एंट्रीने येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मंत्री मुश्रीफ यांनी ए. वाय. यांना संधी दिल्यास कोणाचा पत्ता कट होणार की राधानगरीला तीन जागा मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.