कोल्हापूर : एकीकडे कमी होणारी प्रेक्षकसंख्या व दुसरीकडे शासन कराच्या ओझ्याखाली गुदमरलेल्या चित्रपटगृहांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कधी काळी 1400 चित्रपटगृहे असणार्या महाराष्ट्रातील एक हजार चित्रपटगृहे बंद पडली असून, अवघी 400 चित्रपटगृहे कशीबशी सुरू आहेत. यातीलही निम्मी चित्रपटगृहे अखेरची घटका मोजत आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांना शासनाने अनुदान द्यावे; अन्यथा थिएटर बंद करू, असा इशारा चित्रपटगृह मालकांनी दिला आहे.
चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे चित्रपटगृह. पूर्वी चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहण्याची मजा काही औरच होती; पण काळ बदलत गेला, टीव्हीनंतर व्हीसीआर आला. आता तर इंटरनेटमुळे कोणताही चित्रपट एका क्लिकवर पाहता येतो. त्यातच सिंगल स्क्रीनच्या स्पर्धेत मल्टिप्लेक्स थिएटर आल्याने एक पडदा चित्रपटगृहांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. भारतात पूर्वी 14 हजार चित्रपटगृहे होती. यापैकी पाच हजार चित्रपटगृहे बंद पडली आहेत. केवळ 9 हजार सिंगल स्क्रीन थिएटर शिल्लक आहेत. देशातील एकूण लोकसंख्येचा विचार करता ही संख्या अत्यंत कमी आहे.
मल्टिप्लेक्सला सुरुवात झाली तेव्हा शासनाने त्यांना भरमसाट सवलती दिल्या. त्यांना पाच वर्षे करमणूक कर रद्द केला. यामुळे पाच वर्षांत अंदाजे पाच कोटी रुपयांचा फायदा मल्टिप्लेक्स थिएटरना झाला. याउलट सिंगल स्क्रीन थिएटर मालक करमणूक कर, जीएसटी, पाणी, वीज बिल, पगार व मेंटेनन्स करून मेटाकुटीला आले आहेत. कारण चित्रपटगृहे कोणत्याही स्थितीत बंद करू नये, असा शासन आदेश असल्याने थिएटर मालक हा आर्थिक बोजा सहन करत आहेत. वाढती महागाई, वाढते विजेचे दर आणि प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद यामुळे थिएटर चालकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
हिंदी व मराठी चित्रपटांची निमिर्र्तीसंख्या पूर्वीसारखी राहिलेली नाही. दाक्षिणात्य चित्रपट चालतात. पण एकाच शहरात तीन-चार थिएटरला ते लावले जातात. त्यामुळे प्रेक्षक विभागला जातो. याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरला सर्वात जास्त बसला आहे. त्यामुळे शासनाने सिंगल स्क्रीन थिएटरला तत्काळ अनुदान द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शासनाने सिंगल स्क्रीन थिएटरला अनुदान जाहीर केलेच पाहिजे; अन्यथा पुढील एक-दोन वर्षांत राज्यात एकही चित्रपटगृह शिल्लक राहणार नाही किंवा थिएटरच्या जागेवर अन्य व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. दोन महिने वाट बघणार. अन्यथा राज्यातील सर्व थिएटर बंद करू, असा इशारा सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नितीन दातार यांनी दिला आहे.