कोल्हापूर : जादा परतावा देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रासह सात राज्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी येथील वादग्रस्त ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीच्या फरार संचालिका सुधा सुधाकर खडके (वय 62, रा. गुणे गल्ली, गडहिंग्लज) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी बजावली आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून दोन वर्षे 3 महिने 26 दिवस फरारी असलेल्या संशयित सुधा खडके गोव्यातील तळेगाव दुर्गावाडी येथे आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्यांना गोव्यातून अटक केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. खडके यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 27 मार्चपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला. खडके यांच्यावरील कारवाईमुळे अटक झालेल्यांची संख्या 17 झाली आहे, असेही कळमकर यांनी सांगितले.
दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांच्या पदाधिकारी, संचालक व एजंटांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, मुंबई, पुण्यासह कर्नाटक, गुजरात, राजस्थानसह सात राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदारसह पदाधिकारी, संचालक, एजंटाविरुद्ध 2022 मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. सुभेदारसह 16 जणांना यापुर्वीच अटक करून त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. मात्र सुधा खडके फरार होत्या. पथकाने अखेर त्यांना गोवा येथील तळेगाव दुर्गावाडा येथून ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे.