कोल्हापूर : प्रवीण मस्के
विज्ञान आणि तंत्रज्ञान विश्वात कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्रांती आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. जग आता ‘जनरेटिव्ह एआय’कडून ‘एजेंटिक एआय’कडे वेगाने वाटचाल करत आहे. म्हणजेच एआय केवळ प्रश्नांची उत्तरे देणारे साधन न राहता प्रत्यक्ष काम करणारा स्वायत्त फे्रंड बनणार आहे.
2022 च्या उत्तरार्धात जेव्हा ‘चॅटजीपीटी’ जागतिक पटलावर आले, तेव्हा ती केवळ एक तांत्रिक सुधारणा नव्हती, तर तो एक ‘आयफोन मोमेंट’ होता. गेल्या तीन वर्षांत एआयला प्रश्न विचारले आणि त्याने उत्तरे दिली. परंतु, आता 2026 उजाडत असताना, तंत्रज्ञान जगतात एक मोठी क्रांती घडत आहे. ‘डेटाकॅम्प’च्या ताज्या अहवालानुसार, ‘एजेंटिक एआय’कडे वेगाने सरकत आहोत. सोप्या भाषेत सांगायचे, तर आता एआय फक्त ‘बोलणारा’ उरला नसून तो ‘काम करणारा’ बनत आहे.
पूर्वीचा एआय वापरकर्त्याच्या आदेशावर माहिती देत असे; पण एजेंटिक एआय स्वतः निर्णय घेऊन काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतो. उदाहरणार्थ, प्रवास नियोजन करताना तो कॅलेंडर तपासून वेळ ठरवेल, आवश्यक कागदपत्रे गोळा करेल आणि बुकिंग प्रक्रियेत मदतही करेल. उद्योगजगताच्या अंदाजानुसार, 2026 अखेरपर्यंत सुमारे 75 टक्के कंपन्या अशा एजंटस्मध्ये गुंतवणूक करतील. ‘एजेंटिक एआय’ हे मानवाची जागा घेण्यासाठी नव्हे, तर क्षमता वाढवण्यासाठी आले आहे. योग्य नियमन, नैतिकता आणि मानवी नियंत्रण राखले तर हे तंत्रज्ञान विकासाचे नवे दार उघडू शकते.
इंटरनेटशिवायही जलद काम करता येणार
‘स्मॉल लँग्वेज मॉडेल्स’ हा नवीन ट्रेंड गोपनीयता आणि खर्च या दोन्ही बाबतीत फायदेशीर ठरत आहे. ही मॉडेल्स स्थानिक उपकरणांवर चालत असल्याने डेटा सुरक्षित राहतो आणि इंटरनेटशिवायही जलद काम करता येते. शिक्षण, आरोग्य आणि बँकिंग क्षेत्रात त्यांचा वापर वाढत चालला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्या युगात चॅटबॉटस्चा काळ संपला असून, स्वायत्त एआय एजंटस् येणार आहे, यामुळे नवी क्रांती घडणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत एआयमुळे काही नोकर्यांवर परिणाम होईल; पण त्याच वेळी नव्या कौशल्यांच्या लाखो संधी निर्माण होतील.
- डॉ. ऊर्मिला पोळ, सहायक प्राध्यापिका, संगणकशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ