Kolhapur Municipal Politics | तोंड बघून ठरणार स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी 
कोल्हापूर

Kolhapur Municipal Politics | तोंड बघून ठरणार स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी

मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवकपदाची खांडोळी

पुढारी वृत्तसेवा

सतीश सरीकर

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून राजकारणाचा ‘नवा अध्याय’ सुरू झाला आहे. निवडणुकीतील बंडखोरी थोपवण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेनेच्या नेत्यांनी इच्छुकांना स्वीकृतपदाचे ‘गोड आश्वासन’ दिले होते. त्यानुसार 8 जणांना ‘लॉटरी’ लागली; मात्र उर्वरित इच्छुकांनीही आता ‘शब्द पाळा’चा दबाव वाढवला आहे. परिणामी, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वीकृत नगरसेवकपदाची ‘खांडोळी’ करण्याची वेळ आली आहे. ‘तोंड बघून’ स्वीकृत नगरसेवकांचा कालावधी ठरणार आहे.

काँग्रेस 3, भाजप 3 आणि शिवसेनेचे 2 अशा एकूण 8 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी झाल्या असल्या, तरी त्यामागे सरळ ‘गणित’ नसून शह-काटशहाचे तीव— राजकारण दडले आहे. कालावधी कमी-जास्त करून तोंड पाहून कार्यकाळ ठरवण्याचे गणित मांडले जात आहे. सत्तेसाठी दिलेली आश्वासने आता ‘नेत्यांच्या गळ्यापर्यंत’ आली आहेत. संघटन टिकवायचे की नाराजी ओढवून घ्यायची, या द्विधा मनःस्थितीत नेते सापडले आहेत. पुढील काही महिन्यांत या निर्णयांचे पडसाद सत्ता समीकरणावर उमटणार आहेत.

स्वीकृतपदाचे ‘राजकीय अस्त्र’

स्वीकृत नगरसेवकपदे ‘राजकीय अस्त्र’ म्हणून वापरली जात आहेत. नेत्यांची विरोधकांना रोखण्यासाठी, फुटिरांना धडा शिकवण्यासाठी व प्रभागातील समीकरणे बदलण्यासाठी स्वीकृतचा वापर केला आहे. मनपातील सत्ता समीकरणावर ‘लक्ष’ ठेवणे, आगामी निवडणुकांची तयारी व अंतर्गत असंतोष कमी करणे, या उद्दिष्टांसाठी वापर झाला आहे.

स्वीकृत नगरसेवकांची निवड ‘राजकीय रणनीती’चा भाग आहे. शह-काटशहाच्या या खेळात कोण ‘वरचढ’ ठरणार आणि कोणाला राजकीय ‘फटका’ बसणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

भाजपचा ‘नियोजनबद्ध’ डाव

भाजपने प्रा. जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, सुनील वाडकर यांना संधी दिली आहे. येथेही राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरली. मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यामागे रणनीती असल्याची चर्चा आहे. मनपातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘विश्वासू चेहरा’ म्हणून जाधव यांना पाठविले आहे. प्रा. पाटील व जाधव यांना अडीच वर्षांचा शब्द, तर वाडकर यांना सव्वा वर्षाचा कालावधी आहे.

काँग्रेसचा शह-काटशहाचा डाव

काँग्रेसने राहुल माने, सुनील मोदी, मुश्ताक मलबारी यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी या निवडी ‘राजकीय प्रत्युत्तर’ केल्या आहेत. आ. पाटील यांच्यापासून फुटून शारंगधर देशमुख व माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी शिवसेनेचा मार्ग धरला. देशमुख यांना रोखण्यासाठी त्यांच्याविरोधातच पराभूत झालेले राहुल माने यांना पुन्हा स्वीकृतपद देऊन राजकीय बळ पुरवण्याचा प्रयत्न आ. पाटील यांनी केला आहे. त्यातून ‘प्रभागातील वर्चस्व पुन्हा मिळवणे’ हा स्पष्ट हेतू दिसतो. आजरेकर यांच्याविरोधात मुस्लिम चेहरा उभा करण्यासाठी मलबारी यांची निवड झाली. मोदी शिवसेनेचे सदस्य असतानाही काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक झाले. काँग्रेसमध्येही कालावधीचे गणित आखले आहे. माने, मोदी, मलबारी यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यासंदर्भात पत्रच तिघांनाही दिले आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी पुढचे इच्छुक असे...

काँग्रेस : भूपाल शेटे, मधुकर रामाणे, शिवानंद बनछोडे, राजू साबळे, दिग्विजय मगदूम, जय पटकारे, विनायक सूर्यवंशी व इतर.

भाजप : राहुल चिकोडे, राजसिंह शेळके, विजय सूर्यवंशी व इतर.

शिवसेना : स्मिता माने, इंद्रजित आडगुळे व इतर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT