जयसिंगपूर : प्रियकर आपला फोन उचलत नाही आणि टाळाटाळ करतो, या रागातून एका अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे व प्रियकराबरोबर असलेले अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना शिरोळ तालुक्यात घडली आहे. या प्रकरणाने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शिरोळ पोलिसांनी संबंधित युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
शिरोळ तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी आणि संबंधित युवक यांच्यात प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसले होते. प्रियकर आपला फोन उचलत नसल्याने संतापलेल्या मुलीने रागाच्या भरात स्वतःकडे असलेले 3 अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हे व्हिडीओ वार्यासारखे पसरल्याने खळबळ उडाली.
सोशल मीडियाचा घातक वापर आणि अल्पवयीन मुलांमधील वाढती गुन्हेगारी पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती शिरोळ येथील पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने याबाबतची माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
लॉज मालकही ‘रडार’वर
व्हिडीओ ज्या ठिकाणी चित्रित करण्यात आले, त्यावरून तपासाची चक्रे फिरली. हे कृत्य हातकणंगले तालुक्यातील एका लॉजवर घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी आता हातकणंगले तालुक्यातील संबंधित लॉज मालकालाही चौकशीसाठी पाचारण केले आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नियमांचे उल्लंघन करून प्रवेश कसा दिला, यावरून लॉज मालकावरही कारवाईची शक्यता आहे.