सासू-सासऱ्याने जावयाचा खून केला.  File Photo
कोल्हापूर

धावत्या 'एसटी'मध्ये खुनाचा थरार! जावयाचा सासू-सासऱ्याने पॅन्टच्या नाडीने आवळला गळा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दारू पिऊन मुलीला वारंवार मारहाण करणाऱ्या जावयाचा सासू-सासऱ्यानेच काटा काढल्याची घटना घडली. गडहिंग्लज ते कोल्हापूर धावत्या एसटी बसमध्ये कागलजवळ जावयाचा दोरीने गळा आवळून खून केला. मृतदेह कोल्हापूर एस.टी.स्टँडवर दुकानाच्या दारात ठेवून सासू-सासरे मध्यरात्री पुन्हा गडहिंग्लजला गेले. मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस व शाहुपूरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून खूनाचा छडा लावला. अ‍वघ्या चार तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. (Kolhapur News)

अवघ्या चार तासांतच आरोपींना बेड्या ठोकल्या

संदिप रामगोंडा शिरगावे (वय ३२, रा. चिंचवाड, ता. शिरोळ) असे मृत जावयाचे नाव आहे. तर सासरा हणमंतअप्पा यल्लाप्पा काळे (वय ४८) आणि सावत्र सासू गौरा हणमंतअप्पा काळे (वय ३०, दोघेही रा. हुनीगनाळ, भडगांव, ता. गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर व शाहुपूरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकांनी खुनाचा छडा लावला.

पतीचा बंदोबस्त करा...

संदिप शिरगावे हा पत्नी व मुलासह चिंचवाड येथे राहत हाेता. शिरगावे हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यातूनच तो पत्नीबरोबर भांडण काढून वारंवार मारहाण करत होता. मारहाणीला वैतागून त्याची पत्नी मुलाला घेऊन दोन वर्षापूर्वी गडहिंग्लज येथे माहेरी गेली. शिरगावे हा सुध्दा गडहिंग्लजला सासुरवाडीत येऊन-जाऊन करत होता. चार दिवसांपूर्वी पुन्हा तो गडहिंग्लजला गेला. दारू पिऊन पत्नी व मुलाला मारहाण करू लागला. त्यावेळी मुलीने आपल्या वडिलांना पतीचा बंदोबस्त करा, अन्यथा मुलाला घेऊन मी आत्महत्या करेन, असे सांगितले.

नशेत धुंद असताना खून केला

मुलीला तिचा पती दारू पिऊन मारहाण करत असल्याने काळे यांनी जावयाला समजावून सांगितले. २५ सप्टेंबरला दुपारी शिरगावे याला पैसे देऊन गडहिंग्लज ते कोल्हापूर एस. टी. बसविले. त्यानंतर ते घरी निघून गेले. परंतु, शिरगावे हा पुढच्या स्टॉपवर उतरून पुन्हा सासुरवाडीत गेला. त्यावेळी शिरगावे दारूच्या नशेत धुंद होता. अखेर सासू-सासऱ्याने जावयाला स्वतः एसटीने कोल्हापूरला सोडण्याचा निर्णय घेतला. २५ सप्टेंबरला रात्री गडहिंग्लज ते कोल्हापूर विनावाहक एसटीत तिघेही बसले. त्या तिघांबरोबर इतर दोन प्रवासी होते. काळे दाम्पंत्य व इतर दोन प्रवासी पुढे बसले होते. तर भरपूर दारू पिलेल्या अ‍वस्थेत शिरगावे हा एसटीत मागच्या सीटवर बसला होता.

दारूच्या नशेत शिरगावे हा सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे सासरा काळे याने मागच्या सीटवर जाऊन शिरगावे याच्या बॅगेतील एका पॅन्टची नाडी काढली. त्या नाडीनेच शिरगावे याचा गळा आ‍वळला. कागलजवळ घडलेल्या या घटनेत दारूच्या नशेत धुंद असलेल्या शिरगावे जागीच मृत झाला. त्यानंतर काळे हा पुन्हा पुढच्या सीटवर येऊन बसला. रात्री दहाच्या सुमारास एस. टी. कोल्हापूर आगारात आल्यावर याठिकाणी पहिल्यांदा सासू गौरा हिने बाहेर येऊन चाचपणी केली. एस. टी. स्टँडमधील एका दुकानाच्या दारात शिरगावे याची बॅग ठेवली. त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह त्याच दुकानाच्या दारात आणून ठेवला. शिरगावे याचा मृतदेह टाकून दोघेही पुन्हा एसटीने गडहिंग्लजला निघून गेले. रात्री १.३० वाजता ते पोहचले.

तिकीटावरुन आरोपींचा शोध

गुरूवारी (दि. २६) सकाळी एस. टी. स्टँडमधील सुरक्षा रक्षकांना एका दुकानाच्या पायरीवर तरूण झोपलेल्या अवस्थेत दिसला. सुरक्षा रक्षकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही. संबंधित तरूण मृत झाल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला असता तरूणाच्या गळ्यावर व्रण आढळले. त्यामुळे संबंधित तरूणाचा दोरीने गळा आ‍वळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी एक बॅग मिळाली. तसेच मृताच्या खिशात तपासणी केली असता एक डायरी, गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटीचे तिकीट मिळाले. डायरीत संदिप रामगोंडा शिरगावे असे नाव व एक मोबाईल नंबरही मिळाला. त्यावरून पोलिसांचा तपास सुरू झाला. पोलिसांनी फोन केला असता शिरगावे याच्या पत्नीने फोन उचलला. त्यांना घटनेची माहिती देऊन पोलिसांनी कोल्हापूरला बोलावून घेतले.

दरम्यानच्या कालावधीत शाहुपूरीचे पोलिस निरीक्षक सिंदकर व एलसीबीचे पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची पथके तपास करू लागली. पोलिसांनी एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक पुरूष व एक महिला मृतदेह बाहेर काढून ठेवत असल्याचे आढळले. तसेच शाहुपूरी पोलिसांनी शिरगावे याच्याकडे मिळालेल्या एसटी तिकीटानुसार गडहिंग्लजल पोलिसांना कळवून तेथील एसटी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासायला लावले. दोन्ही सीसीटीव्हीमध्ये काळे दाम्पत्य आढळल्याने ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. दोघांनीही खुनाची कबूली दिली. दरम्यान, दरम्यान शिरगावे हा दारूच्या आहारी गेला होता. त्याच्या आई-वडिल, भावाचा मृत्यू झाला आहे. आरोपी काळे दाम्पत्य शेतमजूर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT