त्र्यंबोली मंदिराच्या सुशोभिकरणानंतरच्या परिसराचा प्रस्तावित आराखडा. Pudlhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : त्र्यंबोली मंदिर परिसर कात टाकणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : धार्मिक महत्त्व असलेल्या त्र्यंबोली टेकडीवरील त्र्यंबोली मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी प्रादेशिक पर्यटन विभागाकडून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून त्र्यंबोली मंदिर परिसरातील दुरवस्था दूर करण्याच्या कामाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबोली मंदिर परिसराला अवकळा आली होती. नवरात्रौत्सवात ललिता पंचमीच्या सोहळ्यासाठी त्र्यंबोली देवीची आख्यायिका प्रसिद्ध असून या परिसराची दुरवस्था दूर व्हावी अशी मागणी भाविकांकडून होत होती. मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या पाठपुराव्याला यश आले असून येत्या सहा महिन्यांत परिसराचा कायापालट करण्याच्या कामाचा श्रीगणेशा केला आहे.

पहिल्या टप्प्यात होणार ही कामे

पहिल्या टप्प्यातील एक कोटीच्या निधीतून त्र्यंबोली मंदिराच्या परिसराच्या वरच्या भागातील कमानीपर्यंतचे रस्ते केले जाणार आहेत. म्हसोबा मंदिरालगत असलेल्या बगीचाचे रूप बदलण्यात येणार आहे. या परिसरात वीज व्यवस्था कोलमडल्याने अंधाराचे साम्राज्य होते. मात्र आता सुशोभिकरणासाठी आलेल्या निधीतून विजेचे पोल दुरुस्त करण्यात येणार आहेत. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

त्र्यंबोली मंदिर परिसराची सध्या दुरवस्था

त्र्यंबोली टेकडीवर त्र्यंबोली मंदिरासह मरगाई, मारुती, म्हसोबा, गणपती यांची मंदिरे आहेत. श्रावण, नवरात्रौत्सव या सणांसह वर्षभर त्र्यंबोलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. मात्र याठिकाणी येणार्‍या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मंदिर परिसरात काही वेळ बसावे म्हटले तर बाकांची अवस्था मोडकळीस आली आहे. जागोजागी कचरा, दुर्गंधी यांनी परिसर व्यापला आहे. भाविकांसाठी भक्त निवास नाही. अर्धवट बांधलेल्या इमारती, स्टेज यांच्याभोवती झाडेझुडपे वाढली आहेत. या परिसरात कुणी फिरकत नसल्याने तळीरामांचा रात्रीच्या वेळी अड्डा भरतो. महिला भाविकांसाठी सायंकाळनंतर हा परिसर असुरक्षित बनला आहे. अतिक्रमणाची बाब चिंतेची बनली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडूनही परिसरातील स्वच्छता व दुरवस्थेबाबत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्र्यंबोली मंदिर परिसराची अवकळा दूर करावी या मागणीसाठी विविध सामाजिक संस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही होत नव्हती.

* कचरा उठाव नसल्याने दुर्गंधी

* मोकाट कुत्र्यांचा त्रास

* अर्धवट बांधकामांना झुडपांचा विळखा

* विजेचे बल्ब गायब

* वॉकिंग ट्रॅकच्या कठड्यांना तडे

* ऐतिहासिक पुतळे मोडकळीस

* बगीचात वाढले गवत तर

* खेळांच्या साहित्याला गंज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT