दत्तवाड : दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरित इमारतीत मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी दोन गंभीर आहेत. गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. प्रभू शिरगावे (वय ४९), लखन अजित कांबळे (वय२४, रा.दत्तवाड) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या दसरा चौक येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. या इमारतीच्या मागील बाजूस गाव पाणीपुरवठ्याची पाण्याची टाकी आहे. त्या टाकीला मधमाशीचे पोळे आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास अचानक मधमाशांनी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत घुसून हल्ला केला. यावेळी दवाखान्यात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका व रुग्ण यांची संख्या मोठी होती. अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्याने सर्वजण भयभीत होवून पळत सुटले. यामध्ये प्रभू शिरगावे, अजित कांबळे यांना डोके, मान, कपाळ, कान, हात, पाय या ठिकाणी चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. तर सिस्टर परनाज सनदी, गीता नागूलपिल्ले, आशा सेविका शुभांगी उरुणकर, वैशाली उरुणकर, आयेशा नदाफ, सुमन भाटले, सुमन गुरव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. किरकोळ जखमींना येथेच उपचार करून घरी पाठवण्यात आले.
आज बुधवार असल्याने गर्भवती महिला व बालकांना लसीकरण देण्यात येत होते. त्यामुळे त्यांची संख्या जास्त होती. सुदैवाने बारा वाजता लसीकरण पूर्ण झाल्याने यातील बरेच रुग्ण घरी गेले होते. त्यावेळी जर हा हल्ला झाला असता तर रुग्ण संख्या वाढली असती. वरातीमागून घोडे आणण्यापेक्षा आधीच मधमाशाचे पोळे काढले असते तर आजची दुर्घटना कदाचित घडली नसती. ग्रामीण रुग्णालयात नेहमीच रुग्णांचा वावर अधिक असतो. गर्भवती माता व बालके हल्ल्याची आधी गेल्याने व आज रंगपंचमीचा सण असल्याने गर्दी कमी झाली होती. अन्यथा अनेकांना मधमाश्या चावल्या असत्या. अशी चर्चा परिसरात सुरु होती.