Tawade Hotel 
कोल्हापूर

kolhapur | न्यायालयाच्या आदेशानंतरही तावडे हॉटेल परिसरात 88 बांधकामे; 33 ब्ल्यू लाईनमध्ये

सर्वेक्षणातून माहिती उघड; आयुक्त डॉ. भारूड यांना आज अहवाल देणार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : न्यायालयाचे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश असतानाही कोल्हापूर ते गांधीनगर मार्गावरील तावडे हॉटेल परिसरात तब्बल 88 बांधकामे करण्यात आली आहेत. न्यायालयाचा अवमान करून ही बांधकामे झाली आहेत. तसेच एकूण बांधकामापैकी तब्बल 33 बांधकामे ब्ल्यू लाईनमध्ये येत आहेत, अशी माहिती महापालिकेच्या सर्व्हेतून उघड झाली आहे. दरम्यान, सर्वेक्षणाचा अहवाल तयार झाला असून, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना बुधवारी (दि. 29) सादर केला जाणार आहे.

तावडे हॉटेल परिसरातील उचगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महापालिकेने या जागेवरील बेकायदेशीर बांधकामांचा 24 व 25 एप्रिल रोजी सर्व्हे केला होता. सर्वेक्षणाचे व्हिडीओ रेकॉडिंगही केले आहे. येथे महापालिकेची 158 एकर जागा आहे. ट्रक टर्मिनससाठी 23.5 एकर जागा आरक्षित आहे. कचरा डेपोचेही आरक्षण आहे. उर्वरीत जागेवर नो डेव्हलपमेंट असे आरक्षण आहे. तरीही तेथे 204 बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत.

महापालिकेने केलेल्या सर्व्हेत जागा कोणाच्या नावावर आहे?, बांधकाम कधी केले?, किती मजले बांधकाम, बांधकामाचा प्रकार, व्यवसाय कोणता, भाडेकरू की स्वतः, जुन्या इमारतीत नवीन बांधकाम केले आहे का? आदी माहिती संकलित केली आहे.

तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामे पाडा, अन्यथा आत्मदहन

कोल्हापूर ते गांधीनगर मार्गावरील तावडे हॉटेल परिसरात अनेक धनदांडग्यांनी बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. कारवाई टाळण्यासाठी ते राजकीय हस्तक्षेप आणण्याचा खटाटोप करत आहेत. परंतु, महापालिकेने संबंधित बेकायदेशीर बांधकामे पाडावीत, अन्यथा महापालिकेसमोर आत्मदहन करू, असा इशारा या प्रकरणातील त्रयस्थ पक्षकार राजेंद्र संगाप्पा कांबळे (रा. म्हसोबा माळ, कोयना कॉलनी, गांधीनगर, ता. करवीर) यांनी दिला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT