कोल्हापूर : शहरातील अत्यंत गजबजलेल्या ऐतिहासिक रंकाळा-संध्यामठ रोडवर महापालिकेने गुरुवारी (दि. २०) सायंकाळी अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली. या रस्त्यावरील ८५ हातगाड्या हटविल्या. फेरीवाल्यांचा विरोध मोडून पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. वादावादीच्या घटनांमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यात बायोमेट्रिकधारकांच्या ७ हातगाड्या आढळल्या. दरम्यान, रंकाळा परिसरात एकूण २५० हातगाड्या असून, सर्वांचे बायोमेट्रिक कार्ड तपासून त्यांचे पत्ते कुठले आहेत ते पाहिले जात आहे. सर्वांना हातगाड्या काढून घेण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.
महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केल्यानंतर संबंधित हातगाडीधारकांनी स्वतःहून गाड्या हटविल्या. मात्र, सूचना देऊनही ज्या हातगाड्या हटविण्यात आल्या नाहीत, त्या महापालिकेच्या पथकाने जप्त केल्या. महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. १ गांधी मैदान, विभागीय कार्यालय क्र. २ छत्रपती शिवाजी मार्केट, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथक कारवाईत सहभागी होते. दरम्यान, कारवाईमुळे रंकाळा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी रंकाळा परिसराची पाहणी केली. रस्त्यांवरील सर्व अडथळे तातडीने दूर करून रहदारीसाठी रस्ता खुला करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू ठेवून अनधिकृत हातगाड्या हटविण्यात आल्या. तसेच, रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पार्किंगचे पट्टे मारण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
कारवाईत उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, निवास पोवार, उपशहर रचनाकार पद्मल पाटील, महादेव फुलारी, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत यांच्यासह अतिक्रमण विभाग, अग्निशमन दल, पोलिस विभाग, तसेच विभागीय कार्यालय क्र. १ व २ मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
फेरीवाल्यांकडून पर्यायी जागेची मागणी
हातावरचे पोट आहे. नोकर्या नाहीत, हातगाडी काढून मिळवून खात आहोत, कारवाई करू नये, अशी विनंती फेरीवाले, महिला महापालिका अधिकार्यांना करत होते. परंतु, रस्त्याला अडथळा होत असल्याने कारवाई होणारच, असे ठामपणे अधिकारी सांगत होते. अधिकार्यांनी संध्यामठ रोडवरील सरनाईक कॉलनीसमोर रंकाळा कंपाऊंडला तात्पुरती जागा देण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले. परंतु, फेरीवाल्यांकडून तांबट कमानीच्या आतील जागेची मागणी करण्यात आली. अखेर शुक्रवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता आयुक्त डॉ. भारूड यांना सर्व फेरीवाल्यांनी भेटण्याचे ठरले.