कोल्हापूर

‘कळे-गगनबावडा’ भूसंपादनाचा 77 कोटींचा प्रस्ताव धूळ खात

Arun Patil

कोल्हापूर : वाहनधारकांची डोकेदुखी ठरलेल्या कोल्हापूर-गगनबावडा महामर्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कोल्हापूर ते कळे रुंदीकरण सुरू आहे; तर कळे ते गगनबावडा या मार्गाच्या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 16 गावांतील 16.66 हेक्टर जमिनीचा 77 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबईतील रिजनल ऑफिसमध्ये धूळ खात पडून आहे. या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

कोल्हापूर-गगनबावडा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पॅचवर्कसाठी आजपर्यंत या रस्त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या रस्त्याचे दुपदरीकरण करून रस्ता रुंदीकरणाचे नियोजन आहे. घाटरस्त्यामुळे या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आणि तीव्र उतार आहेत. त्यामुळे वारंवार अपघाताचे प्रकार घडले आहेत. अरुंद आणि खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना तारेवरील कसरत करीत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही धोकादायक वळणे आणि उतार दूर करण्यासाठी भूसंपादन आवश्यक आहे.

या रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर-कळे मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने कळे-गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीपैकी 90 टक्के भूसंपदान पूर्ण होऊन जमीन ताब्यात असल्याशिवाय रुंदीकरणास निधी मंजूर होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रथम 77 कोटी रुपयांचा भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबई येथील रिजनल ऑफिसला पाठविला आहे. रस्ता रुंदीकरणासाठी या मार्गावरील 16 गावांतील 16.66 हेक्टर जमिनीचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ मुधाळे यांनी सांगितले.

या गावांत होणार भूसंपादन

आसगाव, खेरिवडे, परखंदळे, खडुळे, मुटकेश्वर, लोंधे, किरवे, साक्री, तिसंगी, साळवण, मांडुकली, शेणवडे, मार्गेवाडी, खोकुर्ले, आसळज, पळसंबे, सैतवडे, सांगशी या गावातील भूसंपादन होणार आहे.

SCROLL FOR NEXT