कोल्हापूर : निवृत्तीनंतर कुटुंबासोबत घरात निवांत विश्रांती घेत आरोग्यदायी जीवन जगण्यावर प्रत्येकाचा भर असतो; पण मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून ५५ वर्षांच्या भटकंतीत देशभरातील तब्बल ७१७ गड-किल्ल्यांना भेटी देऊन तिथला इतिहास जाणून घेणारा प्रेरणादायी प्रवास कोल्हापूरचे ज्येष्ठ नागरिक बळवंत बापू सांगळे यांनी केला आहे. आज वयाच्या ७६ व्या वर्षातही भटकंतीसाठी त्यांचा उत्साह युवकांना लाजविणारा आहे. मूळचे जोतिबा डोंगर येथील असलेले (सध्या रा. कोल्हापूर) बळवंत सांगळे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातून अभियंता म्हणून निवृत्त झाले आहेत. १९७० पासून जंगल भ्रमंतीमधून त्यांनी आपल्या भटकंतीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी तब्बल ५५ वर्षे अखंड भटकंती करून देशाच्या विविध राज्यांतील तब्बल ७१७ गडकोट-किल्ले पाहून त्यांचा इतिहास जाणून घेतला.
पावणे चारशे किल्ल्यांवर एकट्याची भटकंती
सांगळे यांनी आपल्या भटकंतीत महाराष्ट्रातील ३६५, दक्षिण भारतातील १७५, उत्तर भारतातील १७७ गडकोट-किल्ले पाहिले. यापैकी एकट्याने तब्बल पावणे चारशे किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. यात सह्याद्री पर्वतरांगेतील २००, तर दक्षिण भारतातील १७५ गड-किल्ल्यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी अनेक मोहिमांसाठी त्यांनी आपल्या दुचाकीवरून प्रवास केला आहे.
महाराष्ट्रातील गडकोट प्रदर्शनास आज प्रारंभ
सांगळे यांनी आपल्या अमृतमहोत्सवी वाटचालीत सुवर्ण महोत्सवी भटकंतीचे क्षण कॅमेराबद्ध केले आहेत. या छायाचित्रांचे प्रदर्शन रविवार, दि. २९ ते शुक्रवार, दि. ४ डिसेंबर या कालावधीत शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक येथे भरविले आहे. याचे उद्घाटन माजी आ. मालोजीराजे यांच्या हस्ते आणि महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व जि.प. सदस्य संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.