कोल्हापूर : प्रिंटिंग व्यवसायाला लागणार्या मशिनरी खरेदी करण्यासाठी 5 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवून तीन महिलांसह 9 जणांनी 69 लाख 59 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी अक्षय दीपक ढाले (वय 30 रा. सदर बाजार, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार तीन महिलांसह 9 जणांवर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, संशयितांचा शोध सुरू आहे.
अक्षय ढाले यांचा सदर बाजार परिसरात प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. त्यांना व्यवसायवाढीसाठी कर्जाची गरज होती. त्यामुळे ते अनेक बँकांच्या संपर्कात होते. दरम्यान, त्यांना एका फायनान्स कंपनीकडून फोन आला. व्यवसायासाठी कमी व्याज दराने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी ढाले यांची कागदपत्रे व बँकेची माहिती ऑनलाईन घेतली. यावेळी ढाले यांचा ‘सिबिल’ पाहून तो चांगला असल्याने 5 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर होईल; पण त्यासाठी प्रोसेसिंग फी व इतर खर्च करावा लागेल, असे सांगितले.
16 जुलै 2025 ते 9 डिसेंबर 2025 या कालावधीत संशयितांनी अक्षय ढाले यांच्याकडून 69 लाख 59 हजार 745 रुपये खात्यातून ट्रान्स्फर करून घेतले. इतके पैसे देऊनही ढाले यांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे ढाले यांना संशय आला.
ढाले यांनी कर्ज मंजूर होत नसेल तर माझे पैसे परत करा, असा तगादा लावला. मात्र संशयितांनी टोलवाटोलवी केली. यामुळे ढाले यांनी 23 जानेवारी रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक करणारे संशयित श्वेतांक सोनी, रुक्साना उमरदीन, सुभाष मंडल, रोशनी, अरोरा, पीयूष, अजय त्रिपाठी, यश ठाकूर, लीगल असिस्टंट अशा 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हे जयपूरमधील असून पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हणमंत कांकडगी तपास करीत आहेत.