कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात नवे 68 कुष्ठरुग्ण; आरोग्य यंत्रणा हादरली

Arun Patil

कोल्हापूर : कुष्ठरोगाच्या निर्मूलनासाठी शासनाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असताना यावर्षीच्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात कुष्ठरुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये 68 नवीन कुष्ठरुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी 14 कुष्ठरोगी करवीर व हातकणंगले तालुक्यात आढळले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे.

काही वर्षांपूर्वी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर कुष्ठरोगमुक्त गाव, जिल्हा, शहर असे फलकही झळकले. मात्र पुन्हा डोके वर काढलेल्या कुष्ठरोगाने यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या गाववार पाहणीत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संख्या वाढल्यामुळे कुष्ठरोग नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा नेमकी करते काय, असा सवाल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुष्ठरोगाच्या निवारणाबाबत शासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मोहीम राबवत आहे. मज्जातंतूमध्ये कुष्ठरोगाचे जंतू वाढत असतात. त्यावर वेळीच उपचार घेतले नाही तर विद्रुपता तसेच व्यंगत्व येत असल्यामुळे कुष्ठरुग्णांकडे उपेक्षितपणे पाहिले जाते. याचनेसाठी हात पसरण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही उपाय नाही.

राज्यात कुष्ठरोगांच्या 32 वसाहती आहेत. त्यात कोल्हापूरचे स्थान अव्वल आहे. एक काळ कुष्ठरोगमुक्त गाव असे फलक झळकवलेल्या ठिकाणी आता कुष्ठरोगी आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यावर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे. एका बाजूला आरोग्याच्या सुविधा वाढत असताना दुसर्‍या बाजूने कुष्ठरोगी वाढणे आरेाग्य यंत्रणेचे अपयश आहे.

SCROLL FOR NEXT