Shirol News | शिरोळ : ‘पदवीधर’साठी ईर्ष्येने ६६ टक्के मतदान 
कोल्हापूर

Graduate Constituency Election | शिरोळ : ‘पदवीधर’साठी ईर्ष्येने ६६ टक्के मतदान

आठ गावांतील १९ केंद्रांवर शांततेत मतदान; शहरासह ग्रामीण भागात उत्साह

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : पुणे पदवीधर मतदारसंघातील शिरोळ तालुक्यात शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, नांदणी, नृसिंहवाडी, कवठेगुलंद, दत्तवाड, शिरढोण या ८ गावांतील १९ मतदान केंद्रांवर मोठ्या उत्साहात व शांततेत मतदान पार पडले. यात शिरोळ तालुक्यातील ९४४५ मतदानापैकी ६२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात ६५.८७ टक्के इतके मतदान झाले.

येथील मालू हायस्कूल, झेले हायस्कूल, न्यु इंग्लिश स्कूल असे एकूण ५, शिरोळ येथील जनता हायस्कूलमध्ये ३, कुरूंदवाड येथील एसपी हायस्कूलमध्ये ३, नांदणी हायस्कूलमध्ये २, नृसिंहवाडी दत्त विद्या मंदिरमध्ये १, कवठेगुलंद येथील लालबहाद्दुर हायस्कूल १, दत्तवाड येथे केंद्रीय शाळा २, व शिरढोण येथील कुमार विद्या मंदिर येथील २ असे एकूण १९ केंद्रांवर मतदानाला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत मतदार मोठ्या संख्येने येत होते. दुपारच्या वेळेस काही मतदान केंद्रांवर गर्दी कमी होती. पुन्हा अडीचनंतर गर्दी वाढली होती.

जयसिंगपूर केंद्रावर जयसिंगपूर, उदगाव, दानोळी, कोथळीसह अन्य गावांतील मतदार येत होते. तर शिरोळ येथील केंद्रावर शिरटी, हसूर, अर्जुनवाड, कनवाड परिसरातील, कुरूंदवाड केंद्रावर कुरूंदवाड, अकिवाट यांसह परिसरातील तर नांदणी केंद्रावर नांदणी, हरोली, चिपरी, धरणगुत्ती, निमशिरगाव, जांभळी, नृसिंहवाडी व कवठेगुलंद केंद्रावर नृसिंहवाडीसह नदीपलीकडील ७ गावे दत्तवाड केंद्रावर घोसरवाड, टाकळीवाडी, खिद्रापूर तर शिरढोण केंद्रावर शिरढोण, टाकवडे, अब्दुललाट, शिरदवाड, यड्राव आदी गावांचे मतदान पार पडले. दरम्यान, मतदार केंद्रावर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, भाजप नेते सावकार मादनाईक, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, कुरूंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, उदय डांगे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, शिवसेनेचे सतीश मलमे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, माजी नगरसेवक डॉ. अरविंद माने यांच्यासह यड्रावकर गट, भाजप, शिंदे-शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

जयसिंगपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या दोन्ही मतदान केंद्रांना भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी भेट देऊन केंद्रप्रमुख, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. तसेच जयसिंगपूर येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी भाजपचे नेते सावकार मादनाईक, माजी नगराध्यक्ष डॉ. निता माने, भाजपचे रामकृष्ण वेताळ, जिल्हा सरचिटणीस सतीश पंडित, मंडल अध्यक्ष सचिन ताडे, माजी मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर, मिलिंद भिडे, राजेंद्र दाईंगडे, सुनील ताडे, विश्वनाथ शिंदे, शुभम ताडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शिरोळमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी ९३.२८ टक्के मतदान

पुणे शिक्षक मतदारसंघातील शिरोळ तालुक्यात शुक्रवारी ९३.२८ टक्के मतदान झाले. तालुक्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, नांदणी, नृसिंहवाडी, कवठेगुलंद, शिरढोण, दत्तवाड या ७ गावांतील केंद्रांवर १,२२० शिक्षक मतदार होते. त्यापैकी १,१३८ शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शिरोळ तालुक्यातील ५२ गावे व ३ शहरांचे मतदान ७ केंद्रांवर पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT