₹64 Lakh Fraud | उसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक pudhari photo
कोल्हापूर

₹64 Lakh Fraud | उसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने ६४ लाखांची फसवणूक

सात जणांविरुद्ध गुन्हा; तळाशीतील शेतकऱ्याची फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

राधानगरी : उसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून तसेच ऊस वाहतूक व्यवसायासाठी घेतलेल्या आगाऊ रकमेची परतफेड न करता एका ट्रक-ट्रॅक्टर ट्रेलर व्यावसायिकाची तब्बल ६४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

याबाबत सदाशिव पांडुरंग चव्हाण (वय ६२, रा. तळाशी, ता. राधानगरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अख्तर इब्राहिम शेख, अपसर इब्राहिम शेख (दोघे रा. पोकरी, ता. देवरे, जि. बीड), विलास वामन चव्हाण, नारायण विलास चव्हाण (दोघे रा. ब्राह्मणवाडा, पोस्ट सवना, ता. शेणगाव), बालाजी चंदू शिरपुरे (रा. लक्ष्मणनगर, कांतेनेश्वर, जि. परभणी), दत्तू रामू पेडणेकर (रा. कोरज, पो. नागणवाडी, ता. चंदगड) आणि अंकुश बाबाराव राठोड (रा. सोनपूर, पो. सोसतांडा, ता. जिंतूर, जि. परभणी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी चव्हाण यांचा ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलरचा व्यवसाय असून ते ऊस गळीत हंगामात विविध साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करतात. २०२४ ते २०२६ या कालावधीत आरोपी क्रमांक १ व २ यांनी १० जोड्या (२० मजूर) ऊसतोड मजूर पुरविण्याचे सांगून प्रत्येक जोडप्यामागे १ लाख १० हजार रुपये अशी एकूण ११ लाख रुपये रक्कम घेतली. तसेच आरोपी क्रमांक ३ व ४ यांनी सात जोड्या (१४ मजूर) मजूर पुरविण्याचे सांगून १ लाख ५० हजार रुपये आगाऊ घेतल्याचे नमूद आहे.

तसेच एकाने गुरुदत्त शुगर, टाकळीवाडी या साखर कारखान्याकडे ऊसतोडणी व वाहतुकीसाठी पाच वाहने घेतली होती. प्रत्येक वाहनासाठी सहा लाख रुपये अशा एकूण ३० लाख रुपयांच्या आगाऊ रकमेपैकी पाच लाख रुपये परत करण्यात आले. उर्वरित २५ लाख रुपये न फेडल्याने कारखान्याने फिर्यादी व त्यांच्या जामीनदारांच्या खात्यातून एकूण २५ लाख रुपये कपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीसाठी एकाने १४ जोड्या ऊसतोड मजूर पुरविण्याचे सांगून १६ लाख ८० हजार रुपये घेतले. त्यापैकी सहा लाख रुपये ऊसतोडणी करून परत केले; मात्र उर्वरित १० लाख ५० हजार रुपये परत केले नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास राधानगरी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT