635.12 mm average in 10 days in Kolhapur district. the rain
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पात्रात पाणी वाढतच आहे. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात दहा दिवसांत सरासरी 635.12 मि.मी. पाऊस

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांत सरासरी तब्बल 635.12 मि.मी. पाऊस झाला आहे. प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही सरासरी 1626 मि.मी. पाऊस कोसळला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच ‘फ्री कॅचमेट’ एरियात (मुक्त पाणलोट क्षेत्र) पावसाच्या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. पंचगंगा नदीतून सध्या 64 हजार 734 क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामध्ये धरणातील पाणी 11 हजार 170 क्युसेक इतके आहे. पंचगंगेत येणारे उर्वरित 53 हजार 564 क्युसेक पाणी हे पावसाचे आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यासह धरण क्षेत्रातही जोरदार वृष्टी होत असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. काही धरण क्षेत्रात तर 200 मि.मी.पेक्षा जादा पाऊस झाला. धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. राधानगरी धरण पूर्णक्षमतेने भरले. धरणाचे पाणलोट क्षेत्र वगळता अन्य परिसरातही (फ्री कॅचमेट एरिया) जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत अतिवृष्टीच झाली आहे. जिल्ह्यात सरासरी झालेल्या 635.12 मि.मी. पावसाचा विचार केला तर दररोज सरासरी सुमारे 63 मि.मी. पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रातही त्यापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दहा दिवसांत धरण क्षेत्रात सरासरी झालेल्या 1626 मि.मी. पावसाचा विचार करता, दररोज धरण परिसरात सरासरी 162 मि.मी. पाऊस गेल्या दहा दिवसांत झाला आहे.

सरासरीच्या 113 टक्के पाऊस

जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे जुलै महिन्यात आतापर्यंत पडणार्‍या पावसाच्या सरासरीपेक्षा 113.9 टक्के जादा पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात 362.9 मि.मी. इतका पाऊस होतो; यावर्षी तो केवळ 200.8 मि.मी. म्हणजेच 55.33 टक्के इतकाच झाला होता. त्या तुलनेत जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात 26 जुलैपर्यंत 587.6 मि.मी. इतका पाऊस होतो; यावर्षी तो 654.6 मि.मी. इतका झाला आहे. जूनपासून आतापर्यंत होणार्‍या पावसाच्या तुलनेत 91 टक्के पाऊस झाला आहे.

SCROLL FOR NEXT