कोल्हापूर

कोल्हापूर : बिद्री कारखान्यासाठी 61 हजार सभासद मतदानास पात्र

Arun Patil

कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 61 हजार 384 मतदार पात्र ठरले आहेत. या पात्र मतदारांची अंतिम यादी बुधवारी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे यांनी दिली.

या कारखान्याच्या 25 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अवघ्या 6 हरकती दाखल झाल्या होत्या. या सहामध्ये नावात बदलाबाबत तीन व दोन हरकती चुकीचे नाव पडले म्हणून दाखल झाल्या होत्या. निवडणूक विभागाने या तक्रारींचे निरसन करून ती नावे पात्र ठरविण्यात आली आहेत. आता यानंतर 11 दिवसांनंतर व 15 दिवसांच्या आत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

बिद्रीसाठी बिनविरोधचे वारे

खर्च वाचविण्यासाठी बिद्री आणि हमीदवाडा या दोन साखर कारखान्यांच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात, यासाठी आ. हसन मुश्रीफ आणि खा. संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी बिद्रीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रस्ताव आल्यास आ. मुश्रीफ व आपण तयार आहोत, असे स्पष्ट केले आहे. यामुळे बिद्री निवडणुकीसाठी बिनविरोध करण्याबाबत वारे वाहू लागले आहे. पण त्यासाठी गट, तट, पक्ष, विभाग यांचा समतोल नेत्यांना बांधावा लागणार आहे. त्यातूनच बिनविरोधचे गणित जमू शकेल, असे जाणकारांचे मत आहे.

SCROLL FOR NEXT