Balumama Devsthan Temple Scam | बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींचा घोटाळा उघड 
कोल्हापूर

Balumama Devsthan Temple Scam | बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींचा घोटाळा उघड

तत्‍कालीन निरीक्षक रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व मध्य प्रदेशसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्‌गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी व इतर संबंधितांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थान समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आला. यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात करणे, फसवणूक करणे तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह इतर संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, त्यांचा वापर करणे तसेच कट रचल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित गैरव्यवहाराची रक्कम ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपये इतकी आहे.

याप्रकरणी धर्मादाय आयुक्त मुंबई येथील निरीक्षक राजेंद्र रंगराव गडकरी यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अलीम मुल्ला यांनी तपासाची व्याप्ती मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असल्याचे सांगितले.

तपासाची व्‍याप्‍ती वाढणार!

या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे, लेखापरीक्षण अहवाल व अन्य पुराव्यांची कसून छाननी केली जाणार आहे. या तपासातून आणखी काही संबंधितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT