कोल्हापूर : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी 110 अर्जांची विक्री झाली, तर 60 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अर्ज भरणार्यांमध्ये मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री वर्षा उसगावकर, नीलम शिर्के, मिलिंद अष्टेकर, आनंद शिंदे, सुशांत शेलार, आनंद काळे, यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकार व तंत्रज्ञांचा समावेश आहे. दरम्यान, 25 मे रोजी छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीची मातृसंस्था असलेल्या अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या 17 संचालकांच्या कार्यकारिणीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मतदान 7 जून रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे होणार आहे, तर 8 जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 19 मेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी संपली. त्यामुळे पडद्यामागील राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. दरम्यान, 25 मे रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून, अर्जाची छाननी केली जाणार आहे. 26 ते 28 मे दरम्यान अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर 29 मे रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होऊन निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शुक्रवारी दुपारी एका हॉटेलमध्ये घडामोडी झाल्याची चर्चाही सुरू होती. अर्ज दाखल केलेल्या अभिनेत्री नीलम शिर्के यांना महामंडळाची अध्यक्ष करण्यासाठी त्यांचे पती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दबावतंत्राचा वापर करायला सुरुवात केली आहे. रिंगणात उतरणार्या दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप काही सभासदांनी केला आहे.