कोल्हापूर

कोल्हापूर : सीपीआरमधील स्वच्छतेच्या कामात सहा कोटींचा ढपला

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सीपीआर हॉस्पिटलमधील स्वच्छतेच्या कामात सहा कोटींचा ढपला पडल्याचा आरोप कोल्हापूर शहर सर्वपक्षीय असंघटित कामगार अन्याय निवारण समितीने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून गरीब कामगारांच्या तोंडचा घास हिरावून घेणार्‍या डीएम एंटरप्रायजेस कंपनीची चौकशी वरिष्ठस्तरावर करावी, अशी मागणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्याकडे केली. यावेळी दीक्षित यांच्यावर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नाचा भडिमार केला.

कृती समितीचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी डीएम एंटरप्रायजेस ही कंपनीला 2017 ला स्वच्छतेचा ठेका देण्यात आला. त्यांच्याकडे 230 कर्मचारी आहेत. किमान वेतन कायद्याप्रमाणे 14 हजार रुपये पगार देणे बंधनकारक आहे. पण सर्व कामगारांना 2017 पासून केवळ 7 हजारच पगार आहे. त्यामुळे दरमहा प्रत्येक कामगाराचे 5 हजार रुपये कंपनीने हडप केले आहेत. दरवर्षी असे 1 कोटी 20 लाख याप्रमाणे पाच वर्षांत 6 कोटी रुपयांचा ढपला संगनमताने पाडण्यात आला आहे.

गोरगरीब कामगारांच्या कष्टाचे पैसे हिरावून घेणार्‍यांना कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सीपीआरमध्ये नुकतेच उद्घाटन झालेल्या मॉड्युलर ओटीच्या कामातही ढपला पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, डीएम एंटरप्रायजेस या कंपनीची चौकशी करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी आर. के. पोवार, दिलीप देसाई, बाबा पार्टे, अशोक भंडारे, अतुल दिघे, मारुती भागोजी, अनिल घाटगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT