आशिष शिंदे
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात उद्योगाची बीजे रोवली आणि त्यातून उभ्या राहिलेल्या उद्योग, सहकार, दूध व्यवसाय, साखर व सूत उद्योगाच्या ‘कोल्हापूर मॉडेल’ने आज देशाच्या औद्योगिक नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. याच परंपरेला आधुनिक उद्योजकतेची जोड मिळाल्याने मोठ्या कंपन्यांच्या कारखान्यांसोबत हजारो छोटे उद्योगही कोल्हापूरच्या अर्थचक्राला गती देत आहेत. जिल्ह्यातील तब्बल ५७ हजार ९४ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांनी १ लाख ८७ हजार ६९२ हातांना रोजगाराची संधी दिली. या उद्योगांतून १ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.
राष्ट्रीय लघुउद्योग दिनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली ही आकडेवारी म्हणजे कोल्हापूरच्या छोट्या उद्योजकतेने उभ्या केलेल्या मोठ्या आर्थिक ताकदीचीच पावती आहे. विशेष म्हणजे, या उद्योगांचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे. राधानगरी, कागल, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लजपासून चंदगडपर्यंत विविध तालुक्यांत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग उभे राहिले आहेत. तालुकानिहाय आकडे पाहता करवीरमध्ये १२ हजार ८५०, शिरोळमध्ये ८ हजार ६१९, कागलमध्ये ६ हजार ९५३ आणि हातकणंगलेमध्ये ६ हजार ५४५ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग आहेत.
करवीर तालुक्यामध्ये ४२ हजार, शिरोळमध्ये २८ हजार हातांना काम
जिल्हा प्रशासनाच्या २०२४-२५ च्या एका अहवालानुसार रोजगाराच्या बाबतीतही या उद्योगांचे योगदान लक्षणीय आहे. करवीरमध्ये ४२ हजार १४८, शिरोळमध्ये २८ हजार २७०, हातकणंगलेमध्ये २२ हजार ३६८ आणि कागलमध्ये २४ हजार ३३ रोजगार या उद्योगांशी जोडलेले आहेत. म्हणजेच छोटा उद्योग केवळ उद्योजकाच्या उत्पन्नाचा स्रोत न राहता त्याच्या आसपासच्या अनेक कुटुंबांसाठी रोजगाराचे साधन बनत आहे. गुंतवणुकीतही करवीरचा वाटा सर्वाधिक असून, तेथे २६२.१४ कोटी, शिरोळमध्ये १७५.८३ कोटी, हातकणंगलेमध्ये १३६.१२ कोटी आणि कागलमध्ये १४१.८४ कोटी गुंतवणूक नोंदली आहे.