कोल्हापूर : नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने 13 नद्यांवरील 56 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद आहे. यासह 19 मार्ग विस्कळीत झाले आहेत. ठिकठिकाणी पाणी आल्याने नऊ मार्गांवरील एसटी बससेवा बंद आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ सुरूच आहे. सर्वच नद्यांना पूर आला आहे. यामुळे 13 नद्यांवरील 56 बंधार्यांवर पाणी आले आहे. वारणा नदीवरील सर्वाधिक 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कासारीवरील 8 तर पंचगंगा आणि घटप्रभा नदीवरील प्रत्येकी 7 बंधार्यांवर पाणी आले आहे. भोगावतीवरील सहा, वेदगंगेवरील पाच, ताम—पर्णीवरील चार, धामणीवरील तीन तर कुंभी, कडवी नदीवरील प्रत्येकी दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा, हिरण्यकेशी आणि तुळशी नदीवरील प्रत्येकी एक बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या बंधार्यांवरील होणारी वाहतूक बंद झाली असून सुमारे 100 हून अधिक गावांचा एकमेकांशी होणारा थेट संपर्क तुटला आहे. या गावांना पर्यायी मार्गाने दूरच्या अंतरावरून ये-जा करावी लागत आहे. परिणामी वेळेचा आणि आर्थिक त्रासही सहन करावा लागत आहे. पावसाने नद्यांना आलेल्या पुराने ठिकठिकाणी चार राज्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यासह सात प्रमुख जिल्हा मार्गावरील, तसेच चार इतर जिल्हा मार्ग आणि चार ग्रामीण मार्गावरील अशा एकूण 19 मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू आहे.
जिल्ह्यातील नऊ मार्गावरील एसटी बससेवा बंद झाली. रंकाळा-पडसाळी, रंकाळा-वाशी, रंकाळा-चौके या मार्गावरील बससेवा पोहाळे-पोहाळवाडी येथे कासारी नदीचे पाणी आल्याने बंद केली आहे. रंकाळा-गवशी व रंकाळा गारीवडे मार्गावर गोठे पुलावर पाणी आल्याने तर कोल्हापूर-आरळे या मार्गावर बीड पुलावर पाणी आल्याने बस वाहतूक बंद आहे. चंदगड-भोगोली, पिळणी, पोवाळवाडी या मार्गावरील एसटी वाहतूक रस्त्यावर पाणी आल्याने बंद करण्यात आली आहे.