Kolhapur Bench | खंडपीठासाठी ५२ एकर अतिरिक्त जागा file photo
कोल्हापूर

Kolhapur Bench | खंडपीठासाठी ५२ एकर अतिरिक्त जागा

राज्य शासनाला प्रस्ताव सादर; लवकरच शिक्कामोर्तब

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील अतिरिक्त ५२ एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या महसूल विभागाला सादर करण्यात आला. या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे खंडपीठासाठी एकूण ७५ एकर जागा उपलब्ध होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आले आहे. त्याचे रूपांतर लवकरच खंडपीठात होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच शेंडा पार्क येथील २३ एकर जागा राखीव ठेवली आहे. या जागेचा प्रस्तावित खंडपीठाच्याच नावे सात-बाराही करण्यात आला आहे. मात्र, खंडपीठासाठी अतिरिक्त जागेची मागणी करण्यात आली. त्यानुसार उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनीही शेंडा पार्क येथील प्रस्तावित जागेची पाहणी केली.

विधी व न्याय विभागाच्या मागणीनुसार शेंडा पार्क येथील रि.स.नं. ५९०/१/२/३/४/५/६ मधील ३ हेक्टर १० आर. आणि रि.स.न. ५९१ मधील २५ हेक्टर १९ आर. अशी एकूण २८ हेक्टर २९ आर. जमिनीपैकी २१ हेक्टर १७ आर. म्हणजे सुमारे ५२ एकर ३१ गुंठे इतकी अतिरिक्त जमीन खंडपीठासाठी प्रस्तावित करण्यात आली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील कुष्ठरोग विभागाकडे असलेली ही जागा खंडपीठासाठी विनामूल्य द्यावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाला सादर केला. या प्रस्तावावर येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होईल, अशी शक्यता आहे.

पालकमंत्री आबिटकर यांच्याकडून पाहणी

खंडपीठासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त जागेसह यापूर्वी देण्यात आलेल्या जागेची सोमवारी सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पाहणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, भूमिअभिलेख करवीरचे उपअधीक्षक किरण माने आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT