Kolhapur FRP Pending | कोल्हापूर विभागात 509 कोटी एफआरपी थकीत 
कोल्हापूर

Kolhapur FRP Pending | कोल्हापूर विभागात 509 कोटी एफआरपी थकीत

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील 19 साखर कारखान्यांनी थकवले शेतकर्‍यांचे ऊस बिल

पुढारी वृत्तसेवा

धीरज बरगे

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील सहकारी व खासगी अशा 19 साखर कारखान्यांनी 509 कोटी रुपये ऊस बिलाची एफआरपी थकवली आहे, तर 20 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकर्‍यांना अदा केली आहे. एफआरपी थकविलेल्या साखर कारखान्यांना साखर सहसंचालक कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित कारखान्यांना 28 जानेवारी रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक एस.आर डोंगरे यांनी दिले होते. मात्र, काही कारणास्तव सुनावणी होऊ शकली नाही. सुनावणीची सुधारित तारीख लवकरच कळवली जाणार आहे.

विभागातील गाळप हंगामास नोव्हेंबर 2025 मध्ये सुरुवात झाली. विभागांतर्गत असणार्‍या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील 39 सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यनच्या अहवालानुसार विभागात 160.44 लाख मे. टन उसाचे गाळप झाले आहे. तर 170.92 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.65 टक्के इतका आहे. गाळप झालेल्या ऊस बिलापोटी शेतकर्‍यांना साखर कारखान्यांनी 4014.28 लाख रुपये एफआरपी देय आहे. यापैकी 3548.26 लाख एफआरपी अदा केली आहे, तर 509 कोटी एफआरपी थकीत आहे.

कोल्हापूर विभागात एकूण 39 साखर कारखाने आहेत. यापैकी 23 कारखाने कोल्हापूर जिल्ह्यात, तर 16 कारखाने सांगली जिल्ह्यात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आजअखेर 99.63 लाख मे.टन उस गाळप तर 108.45 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सांगली जिल्ह्यात आजअखेर एकूण 60.80 लाख मे.टन उस गाळप तर 62.46 लाख क्विंटल इतके साखर उत्पादन झाले आहे. दोन्ही जिल्ह्यांत एकूण 19 कारखान्यांची एफआरपी थकीत आहे. अशा कारखान्यांना साखर सहसंचालक यांनी नोटीस बजावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT