कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'स्टंट कोण करतय हे लवकरच दाखवून देऊ', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना दिला. 50-50 खोके घेणार्यांनी स्टंटची भाषा आम्हाला शिकवू नये, असा हल्लाबोल करत सामंत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर बुधवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर विमानतळावर टीका केली. हे आंदोलन सरकारला बदनाम करण्यासाठी होत आहे. ही स्टंटबाजी आहे, असे सामंत म्हणाले होते. त्याला शेट्टी यांनीही कडाडून प्रत्युत्तर दिले. प्रोत्साहनपर अनुदान अनेक शेतकर्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. पाणी टंचाई असतानाही वीज जोडणी तोडली जात आहे. यामुळे शेतकर्यांची पिके करपत आहेत. शेतकरी मेटाकुटीला आला आहे, आता तरी राज्यकर्त्यांना लाज वाटणार आहे की नाही, असा सवालही शेट्टी यांनी केला.