कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोल्हापूरसह पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर येथे राज्यातील १२ केंद्रांवर ४९.९० टक्के मतदान झाले. या मतदानात ३४०३ पैकी १६९८ मतदारांनी मतदान केले. दरम्यान सोमवारी राम गणेश गडकरी सभागृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यातील एकूण टक्केवारीत कोल्हापुरातील पद्माराजे गर्ल्स हायस्कूल केंद्रावर सर्वाधिक मतदान झाले.
तब्बल नऊ वर्षांनंतर चित्रपट महामंडळाची निवडणूक होत असल्याने सर्व चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले होते. महामंडळाच्या १७ जागांसाठी सुरुवातीला ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १३ जणांनी माघार तर ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १४ जागांसाठी ४४ उमेदवारांमध्ये चुरशीची लढत रंगली. मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनेल आणि १६ अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीचे चित्र अधिकच रंगतदार बनले होते. कोल्हापूरसह सर्वच मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले. दरम्यान, सोमवारी मतमोजणी होणार असून कोणते पॅनेल बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.
चित्रपट महामंडळासाठी कोल्हापुरात सर्वाधिक मतदान
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत रविवारी चुरशीने मतदान झाले. कोल्हापुरात तीन केंद्रांवर सर्वाधिक मतदारांनी हक्क बजावला. रविवारी सकाळी ८ वाजता कोल्हापूरसह राज्यातील सर्व केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत ५, कोल्हापुरात तीन, पुण्यात दोन तर नाशिक व सोलापूर येथे प्रत्येक एक अशा १२ केंद्रांवर मतदार तसेच पॅनेल समर्थकांची संख्या लक्षणीय होती. दोन्ही पॅनेलसह अपक्ष उमेदवारांनी बूथ उभारले होते. केंद्र परिसरात उत्साहाचे वातावरण होते. कोणताही गोंधळ न होता खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले. दरम्यान, पुण्यात एका पॅनेलच्या फलकाचे अज्ञातांकडून नुकसान झाल्याची घटना घडली. यावेळी काहीकाळ तणाव निर्माण झाला.
कोल्हापूर केंद्रवार ७४६ पैकी ५१७ मतदारांनी मतदान केले, तर १ मतदान अवैध ठरले. टक्केवारीनुसार राज्यात कोल्हापूरचे मतदान सर्वाधिक झाले. तर पुण्यातील दोन केंद्रांवर ७२४ पैकी ४६० मतदारांनी मतदान केले. मुंबईत ५ मतदान केंद्रांवर १,५६९ पैकी ५३९ मतदारांनी मतदान केले. सोलापूर केंद्रावर १४६ पैकी ६३, तर नाशिक येथे २१९ पैकी ११९ मतदारांनी मतदान केले.
सोमवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता कोल्हापुरातील पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉल येथे मतमोजणी होणार आहे. तर मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी ७० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांनी दिली.