इचलकरंजी : कोल्हापूर येथील जीएसटी कार्यालयात साहेब असल्याचे सांगून वस्तू व सेवा कर कार्यालयात जीएसटी न भरलेल्या कंपनीतील यंत्रसामग्रीचे स्क्रॅप टेंडर देण्याचे आमिष दाखवून येथील स्क्रॅप व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रसूल बाबू शेख (वय 52, रा. मसुदी चाळ, लाईन बाजार, कसबा बावडा) या संशयितावर गुन्हा दाखल केला.
जीएसटी कार्यालयात संशयित रसूल हा शिपाई म्हणून काम करतो. याबाबतची फिर्याद तौफिक मकसुद खान (वय 41, रा. बंडगर चौक) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे. याची माहिती उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांनी दिली.
बंडगर चौक येथे मकसुद खान यांचा कॉटन वेस्ट आणि स्क्रॅपचा व्यवसाय आहे. दि. 18 फेब—ुवारी 2022 रोजी कार्यालयात असताना कुरूंदवाड येथील शोएब अथणीकर यांच्या समवेत रसूल शेख हा संशयित आला होता. जीएसटी ऑफिसमध्ये साहेब असल्याची ओळख करून देत कार्यालयात जीएसटी न भरलेल्या कंपनीची जप्त यंत्रसामग्री आहे. त्यामधील मयूर दूध डेअरीच्या यंत्रसामग्रीचे स्क्रॅप टेंडर द्यायचे आहे, असे आमिष दाखवले. स्क्रॅपची किंमत दीड कोटींच्या घरात असून 55 लाख रुपयांना हे टेंडर देतो, असे शेख याने सांगितले. त्यासाठी त्याने 50 टक्के रक्कम 45 लाख रुपये त्याने दिलेल्या बँक खात्यावर तौफिक खान यांनी वर्ग केले. यादरम्यान वारंवार त्यांनी टेंडरबाबत विचारणा केली; मात्र संशयिताने टोलवाटोलवी केली.
दोन वर्षे उलटूनही टेंडर मिळत नसल्याने त्यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता रसूल शेख हा जीएसटी ऑफिसमध्ये शिपाई असल्याचे निदर्शनास आले. पुन्हा त्याने साहेबांची बदली झाली आहे. नवीन साहेबांकडून टेंडर मिळवून देतो अशी बतावणी केली; मात्र फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने विचारणा केली असता मोठ्या नेतेमंडळींसमोर ओळखी आहेत, असे सांगून संशयिताने धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. खान यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित रसूल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास 13 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.