अनिल देशमुख
कोल्हापूर : जिल्ह्यातील मतदार यादीतून ४ लाख ४३ हजार ४३७ नावे रद्द होतील, अशी शक्यता आहे. या मतदारांचे गणना अर्जच प्राप्त झालेले नाहीत. यामुळे ही नावे वगळली जातील, याचीच दाट शक्यता आहे. मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) आता केवळ पाच दिवसच सुरू राहणार आहे. या कालावधीत अद्याप गणना अर्ज न सादर केलेल्यांना तो करावाच लागेल; अन्यथा त्यांचे नाव रद्द होणार आहे. यामुळे दि. १७ ऑगस्ट रोजी मतदार यादीतून रद्द होणाऱ्या नावांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे.
मंगळवारपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २ लाख ९ हजार ७२८ मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी योग्य पद्धतीने मॅपिंग झाले नसल्याचे समोर आले आहे. नाव, वय, पत्ता आदींत चुका आहेत. यामध्ये महिला आणि तरुण मतदारांचा अधिक समावेश आहे. या सर्वांना नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांची मतदारसंघनिहाय सुनावणी घेतली जाणार आहे. यावेळी संबंधित मतदारांना आवश्यक पुरावे सादर करावे लागणार आहेत.
शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. या मतदारसंघात ३ लाख ४० हजार ५४८ मतदारांपैकी ४७ हजार ५७९ मतदारांची नावे रद्द होणार आहेत. १५ हजार ५३१ मतदारांना सुनावणीसाठी हजर राहावे लागेल. अद्याप सहा दिवसांचा कालावधी आहे. या दिवसांत एकाद-दुसरा अर्ज येण्याची शक्यता आहे.
प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अद्याप पाच दिवसांचा कालावधी आहे. ज्यांनी अद्याप गणना अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी दि. १७ ऑगस्टपर्यंत ते आपल्या ‘बीएलओ’ यांच्याकडे सादर करावेत.मोहिनी चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी