कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळच्या मतदार यादीत आणखी ४३ संस्थांचा समावेश झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्याकडे आलेल्या सुधारित यादीत ५,४२३ संस्थांचा समावेश आहे. निवडणूक कार्यालयातून मंगळवारी दिवसभरात ३५ जणांनी १ हजार रुपये शुल्क भरून यादी घेतली.
गोकुळ दूध संघाने सहायक निबंधक कार्यालयाकडे ५,४७० संस्था सभासदांची यादी सादर केली होती. यापैकी ३१ संस्थांनी ठराव दाखल केले नाहीत. ५,४३९ संस्थांची यादी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी सादर केली. यापैकी ५,३३२ संस्थांची अंतिम मतदार यादी ४ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली. यानंतर अवसायनाचा आदेश रद्द झालेल्या; पण यादीत समावेश नसलेल्या ४८ संस्थांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या संस्थांचा यादीत समावेश करण्याचा आदेश दिला. त्यानुसार मतदार यादीत ५,३८० संस्थांचा समावेश असल्याची चर्चा सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात झाली. यावेळी निवडणूक अधिकार्यांकडे आलेल्या यादीत ५,४२३ संस्थांचा समावेश आहे.
गोकुळसाठी २२४ उमेदवारी चिन्हे
निवडणूक कार्यालयाबाहेर गोकुळ निवडणुकीसाठी २२४ चिन्हांची छायाचित्रांसह यादी लावली आहे. काही माजी संचालकांनी मंगळवारी या यादीची पाहणी करत उमेदवारी चिन्हांबाबत चर्चा केली. पॅनेल कशी होतील, हे आताच सांगता येणार नाही; पण निवडणुकीसाठी सर्वच पॅनेलची प्रथम पसंती कपबशीला असणार असल्याची चर्चा सुरू होती.