कोल्हापूर : कसबा बावडा येथील अचानक न्यूज पेपर स्टॉलचा 42 वा वर्धापनदिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त वाचकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्टॉलचे मालक कोल्हापूर शहर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संघटक शंकरराव चेचर यांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी 42 वर्षे दैनिक ‘पुढारी’चे अखंड वाचक असलेल्या वाचकांचा दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कसबा बावड्यातील मूळचे शेतकरी असलेल्या शंकरराव चेचर यांनी 1980 पासून दैनिक ‘पुढारी’ पेपरपासूृन वर्तमानपत्र विक्री व्यवसायाला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल स्थितीत सहा बहिणी, दोन भाऊ यांना आधार देत चेचर यांनी हा व्यवसाय सचोटीने वाढवला. आज त्यांना या व्यवसायात पत्नी मंगल, मुलगा रविराज आणि ऋतुराज आणि सुना त्यांना सहकार्य करत आहेत.
गेली 42 वर्षे अव्याहतपणे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणार्या चेचर यांनी जनसंपर्कही वाढवला. त्यातूनच दैनिक ‘पुढारी’, चेचर आणि वाचक असे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. याच नात्यातील तब्बल 42 वर्षांपासून दैनिक ‘पुढारी’चे वाचक असलेले दत्तात्रय पाटील, विजय पाटील, विलास गेंजगे, शिवाजी चोपडे, अरुण पाटील, नामदेव देसाई, लक्ष्मण रणदिवे, बाळासाहेब पाटील, बाबुराव पाटील, विठ्ठल रणदिवे, चंद्रकांत कारंडे, अशोक जाधव, प्रकाश लाड, उत्तम लाखे, गोपाळ माने, शिवाजी पाटील, विलास पाटील, तुकाराम रणदिवे आदींचा दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांच्या हस्ते व शंकरराव चेचर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते. या व्यवसायात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रेरणा सदैव मिळत गेल्याचे सांगत चेचर म्हणाले, दैनिक ‘पुढारी’च्या पाच अंकांपासून या व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी बाजारात अन्य वर्तमानपत्रेही होती. त्यांचाही खप चांगला होता. मात्र, दैनिक ‘पुढारी’ने रविवारची बहार पुरवणी सुरू केली. अस्सल कोल्हापुरी बाणा अंकात उतरवला. यामुळे ‘पुढारी’च्या खपाचा आलेख दिवसेंदिवस वाढत गेला. यामुळे आजही नंबर वनचे दैनिक म्हणून ‘पुढारी’लाच मान असल्याचे त्यांनी सांगितले. वाचकांत जनजागृती करणे आणि व्यवसायाला गती देण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असेही चेचर यांनी यावेळी सांगितले.